फॉर्मल पोशाख

देशात किंवा परदेशात कॉन्फरन्सला गेल्यावर कशा प्रकारचे कपडे घालावेत असा प्रश्न मृदुला देशमुख-बेळे या मैत्रिणीनं विचारला आहे. मृदुला प्राध्यापक आहे. तिला साड्या नेसायला आवडत नाही पण तिला हातमागावरचे कपडे आवडतात. मग ती प्लेन कुडते शिवते आणि त्यावर उत्तम रंगसंगतीच्या सिल्कच्या ओढण्या वापरते.

मृदुलानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काही तज्ज्ञ नाही. पण मला जे काही वाटतं आहे ते मी इथे सांगते आहे. सर्वसाधारणपणे कॉन्फरन्सला फॉर्मल कपडे घालावेत असा संकेत आहे. आता जगभर स्त्रियांसाठी फॉर्मल कपडे म्हणजे स्ट्रेट कट ट्राऊजर्स आणि शर्ट, किंवा नी लेंग्थ स्कर्ट आणि शर्ट, वर ब्लेझर, ब्लेझर नको असल्यास सिल्कचा स्कार्फ असं वापरलं जातं.

आपल्या देशात ज्या बायका बँका, वित्तिय संस्था, महाविद्यालयं अशा ठिकाणी काम करतात त्या साड्या नेसण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे साहजिकच आपल्याकडचा फॉर्मल पोशाख साडी हाच आहे. फक्त एरवी नेसण्याच्या साड्या आणि कामाच्या ठिकाणी नेसायच्या साड्या यात फरक आहे. म्हणजे एरवी तुम्ही गडद रंगसंगतीच्या, एम्ब्रॉयडरी केलेल्या, काठापदराच्या, जरीच्या, नेटच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसू शकता. पण जेव्हा कामावर जाताना साडी नेसायची असेल तेव्हा काही पथ्यं पाळावी लागतात. म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही किती आणि कशा प्रकारच्या लोकांना भेटता याचा विचार साड्या निवडताना करणं गरजेचं आहे.

समजा तुम्ही एखाद्या बँकेत मोठ्या अधिकारपदावर आहात तर मग तिथे तुम्हाला मीटिंग्जना, कॉन्फरन्सना जावं लागतं, वेगवेगळ्या लोकांना रोज भेटावं लागतं. तेव्हा तुम्ही खादी, रॉ सिल्क, टस्सर सिल्क, कॉटन, कोटा अशा पोताच्या साड्या नेसाव्यात असं मला वाटतं. या साड्या निवडताना सौम्य रंगसंगती, सौम्य डिझाइन निवडावं. याबरोबर उत्तम फिटिंगचं, पण साध्या पद्धतीचं ब्लाऊज असावं. म्हणजे कोपरापर्यंतच्या बाह्यांचं किंवा थोड्या लांब बाह्यांचं किंवा साधं स्लीव्हलेसही चालेल. पण या ब्लाऊजना विचित्र आकाराचे गळे, नाड्या, लेस, नाड्यांना लावलेली घुंगरं, मणी आदी नसावेत. कामाच्या जागी कशा साड्या नेसाव्यात याचे हे संकेत आहेत पण कठोर नियम नाहीत. काही बायका काठापदराच्या कांजीवरम नेसून कामावर जातात पण त्या उत्तम रितीनं त्याला कॅरी करतात. त्यामुळे आपण कशात कम्फर्टेबल आहोत याचा विचार करणं महत्वाचं.

या साड्यांवर ज्युलरी कशी घालावी? तर या साड्यांवर अगदी माफक पण उत्तम दर्जाची ज्युलरी घालावी. कुणी फक्त मंगळसूत्र घालत असेल तर ते नाजूक असावं, आपल्याकडे किती सोनं किंवा हिरे आहेत याचं प्रदर्शन करणारं नसावं. लहानसं गळ्याशी बसणारं हि-याचं किंवा सोन्याचं मंगळसूत्र, मोत्याचा नाजुकसा सर, सोन्याची साखळी, चांदीची साखळी असं आपल्या आवडीप्रमाणे काहीही घालता येईल. आपल्या कपड्यांच्या रंगसंगतीला अनुसरून त्याची निवड करावी. बरोबर मॅचिंग कानातलं, हातात एखादी बांगडी किंवा ब्रेसलेट  घालावं (मला स्वतःला मोकळे हातच आवडतात).

तुम्हाला साड्या वापरायच्या नसतील तर उत्तम दर्जाच्या कापडाचे म्हणजे खादी, रॉ सिल्क, कॉटन, सिल्क अशा प्रकारच्या कापडांचे, चांगल्या फिटिंगचे सलवार कमीज वापरू शकता. काही जणांना सिंथेटीक कपडे वापरायला सोपे वाटतात पण ते दिसायला तितकेसे चांगले दिसत नाहीत. त्यावर साधीशी ज्युलरी घाला. तुम्हाला पाश्चात्य पद्धतीचे कपडे आवडत असतील तर फॉर्मल ट्राऊजर्स आपल्याकडे सर्रास मिळतात. त्यावर फॉर्मल शर्ट आणि एखादा सिल्कचा स्टोल किंवा स्कार्फ घेतला की काम भागतं. किंवा लिनन ट्राऊजर्स आणि लिनन शर्ट किंवा टॉप्सही उत्तम दिसतात.

पण तुम्ही जाहिरात, मनोरंजन, लाईफस्टाईल नियतकालिक अशा ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला कपड्यांची निवड करण्यासाठी मनसोक्त चॉईस आहे. अशा ठिकाणी तुम्ही काहीसे इनफॉर्मल कपडे घालू शकता. म्हणजे लिनन ट्राऊजर्स, हँड ब्लॉक प्रिंटच्या कुर्तीज, फंकी टॉप्स, फ्लोरल स्कर्ट्, हारेम पँट्स, पलाझो, लाँग ड्रेसेस असं काहीही तुम्ही घालू शकता. बरोबर सिल्व्हर ज्युलरी किंवा हल्ली मिळते तशी मोठ्या मण्यांची, बोल्ड रंगसंगतीची ज्युलरी घालू शकता. बरोबर वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या कापडी बॅग्ज वापरू शकता.

आता मृदुलानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर – जेव्हा परदेशात भारतीय प्रतिनिधी म्हणून तुम्ही कॉन्फरन्सला जाता तेव्हा साडी हा फॉर्मल पोशाख होतो. पण जर साडी नेसायला आवडत नसेल तर मग खादी, रॉ सिल्क, टस्सर सिल्क अशा पोतामध्ये सलवार कमीज वापरावेत. किंवा वेल फिटेड पँट आणि अशाच पोताचे कुडते वापरावेत. रंग निवडताना साधारणपणे पेस्टल शेड्स किंवा ऑफव्हाईट, काळा, काळ्याजवळ जाणारा निळा, पांढरा असे मोनोक्रोम्स वापरावेत. किंवा अगदी फिका असेल तर कुठलाही रंग चालेल. पण राणी, चिंतामणी, केशरी, आंबा, लिंबू असे रंग शक्यतो निवडू नयेत. सलवार कमीजवर ओढणी घ्यायची नसेल तर मग स्टँड कॉलर, अगदी लहान गळा किंवा बंद गळा असे सलवार कमीज वापरावेत. मग त्यावर ओढणी नाही घेतली तरी चांगलं दिसतं. पण जर गोल, व्ही, चौकोनी असा गळा असेल तर ओढणी घ्यावी. ओढणीचा रंगही सौम्य असावा. वर ज्या रंगांचा उल्लेख केला आहे ते रंग ओढणीसाठीही वापरू नयेत. बरोबर उत्तम डिझाइनच्या लेदर चपला किंवा बूट वापरावेत. फुटवेअरला मणी, मोती, खडे, टिकल्या असं काहीही लावलेलं असू नये. अंगावर येतील अशा रंगांच्या किंवा सोनेरी, चंदेरी अशा चमचमणा-या रंगांच्या चपला, बूट, पर्स वापरू नयेत. गळ्यात एखादंच नाजूकसं गळ्यातलं, मोत्याचा सर असं काही तरी घालावं. कानातलंही लहानसं असावं.

सलवार कमीज ऐवजी कुर्ती वापरणार असाल तर हीच पथ्यं पाळावीत. कुर्तीवर रेशमी स्टोल किंवा स्कार्फ उत्तम दिसतो. पँट मात्र उत्तम फिटिंगची हवी. गबाळी अजिबात नको.

तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते जरूर कळवा. सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष