प्रवासाच्या याद्या

येत्या ३१ तारखेला इस्त्रायलला जाणार आहे. या देशाबद्दल मला फार आकर्षण आहे. त्यांचं राष्ट्रप्रेम आणि आपलं अस्तित्व कायम राखण्यासाठीचे त्यांचे जीवापाड प्रयत्न फार भावतात. इस्त्रायलमध्ये ऐतिहासिक स्थळं तर बघण्यासारखी आहेतच पण तिथला निसर्ग वेगळाच आहे. शिवाय तेल अवीव हे अगदी आधुनिक शहर आहे, जिथे जगातल्या इतर मोठ्या शहरांची वैशिष्ट्यं तर दिसतातच पण तिथे खास इस्त्रायलचा ठसा पण बघायला मिळतो.

तर जायची तयारी सुरू झाली आहे. आजच व्हिसासाठीची कागदपत्रं सबमिट केली आहेत. कुठल्याही प्रवासाला जायचं म्हटलं की मला उत्साह येतो. जिथे जाणार आहे तिथल्या ठिकाणांबद्दल माहीत करून घ्यायचं, तिथे काय खायलाप्यायला मिळतं ते शोधायचं, तिथे काय बनतं त्याबद्दल माहिती घ्यायची आणि असं सगळं होमवर्क करून मग प्रवासाला निघायचं. अर्थात अगदी प्रवासाचा कार्यक्रम अगदी काटेकोर पाळायचा नाही. तिथे पोचल्यावर एखाद्या दिवशी वाटलं की आज काहीच करायचं नाही, तर नुसतंच रस्त्यावरच्या एखाद्या कॅफेत बसून रस्त्यावरची गर्दी न्याहाळत शांतपणे कॉफी किंवा हॉट चॉकलेट पित बसायचं. चहा मला भारतीयच आवडतो, त्यामुळे बाहेर गेलं की फक्त कॉफी किंवा हॉट चॉकलेटच.

तर सध्या मी इस्त्रायलमय झालेय. तिथल्या लोकांशी संपर्क साधणं, त्यांच्याशी मेलवर, मेसेजवर बोलणं सुरू आहे. प्रवासासाठी वेगवेगळ्या याद्या करणं हे तर माझं फार म्हणजे फार लाडकं काम आहे. त्यानुसार वेळोवेळी याद्या करणं सुरू आहे. आतापर्यंत मी ज्या काही याद्या केल्या आहेत त्याबद्दलच आजची ही पोस्ट. माझ्या प्रवासासाठीच्या याद्या अशा असतात.

पहिली यादी – आपण जिथे जातो आहोत तिथल्या ठिकाणांची. म्हणजे आपण एखादा देश बघायला जात असू तर आपल्याला मोजक्या वेळात तो संपूर्ण देश बघणं शक्य नसतं. मग आपल्या हातात जो वेळ असेल तो लक्षात घेऊन आपल्याला काय बघायचं आहे हे नक्की करायचं. अर्थात आपल्याबरोबर प्रवास करणा-यांची आणि आपली आवडनिवड लक्षात घेऊन ही ठिकाणं ठरवायची. ती ठरवताना त्या देशातलं Transportation अर्थात परिवहन व्यवस्था लक्षात घ्यायची. म्हणजे अमेरिकेत मोठी शहरं सोडली तर आपल्याला आपल्या होस्टवर प्रवासासाठी अवलंबून राहावं लागतं. तिथे सगळीकडे आपल्यासारख्या रिक्षा, टॅक्सी, लोकल नसतात. युरोपात ब-याच ठिकाणी मेट्रो, ट्रॅम, लोकल्स, टॅक्सी उपलब्ध आहेत. आपल्या आशियायी देशांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट उत्तम असतो. आणि तो तुलनेनं स्वस्तही असतो. हे सगळं लक्षात घेऊन प्रवासात आपल्याला काय झेपणार आहे, परवडणार आहे ते ठरवायचं आणि मग ठिकाणं ठरवायची. या ठिकाणांची अंतरं बघायची, हवामान बघायचं. आपली थोडी तयारी असेल तर आता हे सगळं ऑनलाइन करता येतं. Trip Advisor ही साइट यासाठी उत्तम आहे. या साइटचं app सुद्धा आहे. आतापर्यंत मी या साइटवर बघून जी बुकिंग केली आहेत ती उत्तम होती. ही साइट हॉटेल्सला गुणवत्ता प्रमाणपत्रं पण देते. याशिवाय Booking.com, Makemytrip.com, Goibibo.com यासारख्या साइट्सही आहेत.

राहण्यासाठी मी सध्या सगळ्यात प्रेमात आहे ती Airbnb या साइटच्या. या साइटवर तुम्हाला जगातल्या बहुतांश देशांमध्ये राहण्यासाठी वाजवी किंमतीत उत्तम जागा मिळते. ही साइट वापरायला अतिशय सोपी आहे. तुम्ही जिथे राहू इच्छिता तिथले फोटो तुम्हाला बघायला मिळतात. ऑनलाइन व्यवहार करून १० मिनिटात तुम्ही जगाच्या कानाकोप-यातलं बुकिंग करू शकता. आम्ही दोन वर्षांपूर्वी लंडनला गेलो होतो तेव्हा मी पहिल्यांदा या साइटवरून बुकिंग केलं होतं. नॉटिंगहिलमध्ये (हो, तेच हाऊस विथ द ब्लू डोअर!) दोन बेडरूमचं उत्तम अपार्टमेंट होतं. तिथे आम्ही चौघे आणि आमचा एक मित्र असे पाचजण आरामात राहिलो. खाली उतरलो की बस स्टॉप होता आणि बसच्या दोन स्टॉपनंतर ट्यूब स्टेशन. इतक्या मध्यवर्ती भागात जर आम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये दोन खोल्या घेतल्या असत्या तर आम्हाला कितीतरी अधिक पैसे मोजावे लागले असते. आताही मी जेरूसलेम आणि तेल अवीवमध्ये याच साइटवरून मस्त कॉटेजेस बुक केली आहेत तीही शहराच्या मध्यवर्ती भागात.

दुसरी यादी कपड्यांची – एकदा त्या देशातलं हवामान बघितलं की त्याप्रमाणे कपडे भरायचे. मी प्रवासात एकही कपडा धुवत नाही. जितके दिवस जायचं तितके सेट्स घेऊन जाते. इस्त्रायलमध्ये सध्या थंडी आहे, त्यामुळे थंडीचे कपडे बेडच्या स्टोअरेजमधून बाहेर आले आहेत. ते ड्रायक्लिन करूनच ठेवलेले असतात. त्यामुळे मला त्यांना थोडी हवा दाखवून ते भरायचे आहेत. थंडी बरीच आहे त्यामुळे थर्मल्स, स्कार्व्हज, मोजे, टोपी हे सगळं भरायचं आहे. अशा प्रवासात ४ जीन्स आणि १० जाड टॉप्स, २ थर्मलचे सेट्स, आतल्या कपड्यांचे १२ सेट्स, टॉप्सवर मिक्स अँड मॅच करता येतील असे ४-५ स्टोल्स किंवा स्कार्व्हज, मोज्यांचे ३ सेट्स, नाइट ड्रेसचे ३ सेट्स, एखादी टोपी, २ फेस नॅपकिन, २ पंचे असं पुरेसं होतं. या सामानाला फारशी जागा लागत नाही. मध्यम आकाराच्या बॅगमध्ये व्यवस्थित बसतं. शिवाय इतरही सामान बसतं.

तिसरी यादी टॉयलेटरीची – यात टूशपेस्ट, टूथब्रश, शॅम्पू, कंडिशनर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, फेस वॉश, फेस क्रीम, शॉवर जेल, मॉस्किटो रिपेलंट, डिओ किंवा परफ्यूम, माऊश वॉश, कंगवा (विशेषतः नॉनव्हेज खाणा-यांनी तर न्यावाच, आपण तिथे लोकांना भेटणार असतो.) यातल्या ब-याचशा गोष्टी हॉटेल्समध्ये देतात. पण आपल्या आपल्याकडे असाव्यात. प्रवासासाठी लहान बाटल्या मिळतात.

चौथी यादी एक्सेसरीजची – आता यात पुरूषांना फारसा वाव नाही. बायका लिपस्टीक्स, कानातली, गळ्यातली असं काही घेऊ शकतात. तेही शक्यतो फार घेऊ नये. मौल्यवान वस्तू तर घेऊच नयेत.

पाचवी यादी – सुक्या खाण्याची. आता इस्त्रायलमध्ये आम्ही तिथले वेगवेगळे पदार्थ चाखणार आहोतच. पण फिरताना अचानक काही खावंसं वाटलं तर थोडा सुकामेवा, थोडा चिवडा, थोडे तिळगुळाचे लाडू असं घेणार आहोत. सुकं खाणं फार घेऊ नये. जिथे जातो आहोत तिथले पदार्थ खाऊन बघायलाच हवेत.

सहावी यादी – तिथे ज्या लोकांना भेटणार आहोत त्यांना द्यायच्या भेटवस्तूंची. आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांना द्यायला लहानशी भेटवस्तू न्यायला हवी असं मला वाटतं. ती भेटवस्तू फारसं वजन नसलेली आणि आपल्या देशाची काही खासियत असलेली असावी. उदाहरणार्थ – बायकांना छानसे स्टोल्स किंवा सिल्व्हर इयररिंग्ज देता येतात. पुरूषांना खादीचे साबण किंवा लहानसं अत्तर किंवा लहानसं खादीचं पाऊच किंवा पाकिट असं काहीसं देता येतं.

सातवी यादी – औषधांची. यात आपल्याला नेहमी लागणारी औषधं, पॅरॅसिटीमॉलसारखं तापासाठीचं आणि अंगदुखीसाठीचं औषध, सर्दीसाठी औषध आणि नेजल ड्रॉप्स, एखादं कॉमन अँटिबायोटिक, एखादं स्ट्राँग पेनकिलर असं ठेवावं.

आठवी यादी – मूळ पासपोर्ट आणि व्हिसाच्या कॉपीज, शिवाय पासपोर्ट आणि व्हिसा स्कॅन करून स्वतःलाच मेल करून ठेवावी. परदेशात लागणारं चलन, फोरेक्स कार्ड, तिथे लागणारं मोबाइल सिम कार्ड याची असावी.

सातवी यादी – बरोबर नेणार असलेल्या गॅजेट्सची. म्हणजे कॅमेरा, मोबाइल, आयपॅड, आयपॉड, टॅब, लहान स्पीकर (गाणी ऐकायला), हेडफोन्स किंवा इयरफोन्स, लॅपटॉप. आता हे सगळं किंवा यापैकी काही गोष्टी न्यायच्या असतील तर त्यांचे चार्जर्स लागतात. तेव्हा यातलं काय न्यायचं आहे ते ठरवून त्यानुसार यादी करा. म्हणजे काही विसरणार नाही. आणि हो युनिर्व्हसल अडाप्टर न्यायला विसरू नका. तोही माणशी एक!

आठवी यादी – मनोरंजनाची – मोबाइलमध्ये मस्त आवडती गाणी घाला. जर आरामासाठी चालला असाल तर पेनड्राइव्हवर आवडत्या फिल्म्स घ्या. मला आणि माझ्या नव-याला प्रवासात पुस्तकं लागतातच. मग प्रवासाआधी ही खरेदी मस्ट आहे. आवडती २-३ पुस्तकं तरी बरोबर ठेवा.

नववी यादी – फुटवेअर – प्रवासात शक्यतो आरामदायी वॉकिंग शूज हवेत. त्यासाठीच्या मोज्यांचे ३-४ जोड हवेत. एखादी चप्पलही बरोबर घ्या.

दहावी यादी – तिथे काय काय खायचं आणि प्यायचं हे याची. हो! हा प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जिथे जे पिकतं, बनतं ते खायलाच हवं. आम्ही दोघेही ते इमानेइतबारे पाळतो. याविषयी माहिती देणा-या ब-याच ऑनलाइन साइट्स आहेत. त्यानुसार मी यादी केलेली आहे. तिथल्या फूड ब्लॉगर्सना भेटणार आहे. काही रेस्टॉरंट्सच्या शेफ्सना भेटणार आहे. ते तर करायला हवंच.

हुश्श! तर या याद्या केल्या आहेतच. आता सामान भरणं फारसं अवघड नाहीये. शिवाय मोबाइलमध्ये तिथल्या टॅक्सी कंपन्यांचे नंबर्स, तिथे जे लोक भेटणार आहेत त्यांचे नंबर्स सेव्ह केले आहेत. आता जनरली वायफाय सगळीकडे मिळतं त्यामुळे फेसबुकवरूनही संपर्क साधता येतोच. पॅकिंग करताना फोटो शेअर करेन.

तो अब इस्त्रायल दूर नही!

काही दिवसांपूर्वी मी याच विषयावर एक पोस्ट लिहिली होती. ती ज्यांना वाचायची असेल त्यांच्यासाठी लिंक परत शेअर करते आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=656394324543430&id=512517355597795

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#प्रवासाचेफंडे #प्रवासाचीयादी #सोपाप्रवास #सोपापरदेशप्रवास #साडीआणिबरंचकाही #Traveltips #easytravel #packingtips #sareesandotherstories #ilovetravel #lovetotravel #happytravelling

सायली राजाध्यक्ष