केसविरहित सौंदर्य

भरघोस केस असणं हे आपल्याकडे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. केस जितके घनदाट तितके ते छान असं मानलं जातं. केसांच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे स्त्रीपुरूषांचं व्यक्तिमत्व किती वेगवेगळं दिसतं. कुणाचे कुरळे, कुणाचे सरळ, कुणाचे वेव्ही, कुणाचे जरठ, कुणाचे रेशमासारखे मऊ, कुणाचे सोनेरी, कुणाचे भुरे तर कुणाचे काळेभोर. केसांमुळे प्रत्येक माणसाला एक व्यक्तिमत्व प्राप्त होत असतं. मोकळ्या केसांत माझ्या तू जीवाला गुंतवावे, ये किसकी जुल्फ बिखरी-जग सारा गया महक महक, ये रेशमी जुल्फे, जुल्फों की घटा के लेकर अशी एक ना अनेक गाणी केसांच्या सौंदर्याचं वर्णन करणारी आहेत.

माणसाला विशेषतः बाईला केस नसतील तर माणूस विद्रूप दिसतो असा एक समज आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. त्यामुळेच जुन्या काळात विधवा झालेल्या बाईचा मोह कुणाला पडू नये म्हणून तिचं केशवपन करण्याची अत्यंत भयानक प्रथा हिंदू धर्मात होती. सुंदर केस असलेल्या स्त्री-पुरूषांच्या व्यक्तिमत्वात केस भर घालतात हे खरं. पण व्यक्तिमत्व फक्त दिसण्यावरच अवलंबून असतं का? तुमचा स्वभाव, तुमची लोकांशी वागण्याची पद्धत, तुम्ही जे काही घालता ते तुम्ही कसं कॅरी करता या आणि अशा किती तरी गोष्टींवर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. अतिशय देखणं रूप असणारे स्त्री पुरूष वागण्या-बोलण्यात जर उद्दाम, उर्मट असतील तर ते वाईटच दिसतात.

काही वर्षांपूर्वीपर्यंत टक्कल असणं लोकांना लाजिरवाणं वाटायचं. त्यामुळे किती लोक असतील-नसतील तेवढे केस आपल्या डोक्यावर विखरून टक्कल नसल्याचं भासवायचे. पण आता तसं राहिलेलं नाही. किती तरी तरूण मुलं टक्कल पडायला सुरूवात झाली की गोटा करून टाकतात. आणि अतिशय आत्मविश्वासानं वावरतात. ते त्यांना शोभूनही दिसतं. पण बायकांना केस नसणं हे आपल्याकडे अजूनही विचित्र समजलं जातं. केस नसलेली बाई म्हणजे बालाजीला वेणीदान करून आलेली तरी असेल नाहीतर केमोथेरपी तरी घेत असेल असा सगळ्यांचा समज होतो. पर्सिस खंबाटा या मॉडेलनं फॅशन म्हणून पहिल्यांदा पूर्ण टक्कल केलं. त्यानंतर प्रोतिमा बेदी, डायांड्रा सोरेससारख्या काही मोजक्या बायकांनी टक्कल दिमाखानं मिरवलं.

केमोथेरपीनं गळालेले केस काही काळानंतर परत येतात. पण कल्पना करा की तरूण वयात गळालेले केस परत आलेच नाहीत तर… आज मुंबई मिररमध्ये अशाच एका मुलीची अत्यंत प्रेरणा देणारी स्टोरी आली आहे. या मुलीला मी तर मनातल्या मनात सलाम केला. अंकिता वाडेकर असं त्या मुलीचं नाव आहे. अंकिता पंधरा वर्षांची असताना अचानक तिचे केस गळायला लागले. तिच्या डोक्यावर केशविरहीत असा एक भाग दिसल्याबरोबर तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. पण काहीही निदान झालं नाही. तिला आहारात बदल सुचवण्यात आला. बदाम, भाज्या, अंडी खायला सांगण्यात आलं. सगळं केल्यावरही काही होईना. तिचे केस तसेच वेगानं गळत राहिले. सगळ्या वैद्यकीय चाचण्या नॉर्मल आल्या. कारण मुळात अंकिता हेल्दी होतीच. मग एका त्वचारोग तज्ज्ञानं तिच्या आजाराचं निदान केलं. अंकिताला एलोपेशिया ही डिसॉर्डर होती. साध्या भाषेत सांगायचं तर केसांची मूळं नष्ट होतात. नवीन केस उगवायचे बंद होतात. अंकिताला स्टिरॉईड्स देण्यात आली. त्यानं तिचे केस परत आले. छान दिसायला लागले. पण वेगानं तिचं वजन वाढलं. स्टिरॉईड्स बंद केल्यावर दुप्पट वेगानं तिचे केस गळायला लागले. डॉक्टरांनी डोस वाढवायला मनाई केली कारण त्या औषधांचे दुष्परिणाम होते.

या सगळ्या प्रकारानंतर तब्बल एक वर्ष अंकिता घराच्या बाहेरच पडली नाही. नंतर ती धीर करून घराच्या बाहेर पडायला लागली. काही दिवसांनंतर डॉक्टरांनी तिला केसांचा विग वापरायचं सुचवलं. ती विग वापरायला लागली. तिचा आत्मविश्वास परत आला. ती तोपर्यंत नोकरीला लागली होती. एक दिवस ती जलद ट्रेननं कामावर निघाली असताना त्या गर्दीत एका बाईनं आधारासाठी तिचा विग धरला आणि तो विग निघाला. ती बाई तर घाबरलीच पण इतर लोकही तिच्याकडे विचित्र नजरेनं बघायला लागले. अंकिता दोन दिवस ऑफिसलाच गेली नाही. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. पण तिनं त्यानंतर एक निर्णय घेतला. यापुढे कधीही विग न लावण्याचा.

अंकितानं त्या दिवसापासून विग लावणं सोडून दिलं. तिचे कुटुंबीय तिच्या पाठीशी आहेत. विग न लावता पहिल्यांदा ऑफिसला गेल्यावर तिला अवघड वाटत होतं. पण तिच्या सहका-यांनाही आता त्याची सवय झाली आहे. ती विग तर लावतच नाही पण स्कार्फही बांधत नाही. एकदा एका वयस्कर बाईनं अंकिताला सांगितलं की, मला तुझी हेअरस्टाइल आवडली. असे प्रसंग तिला आनंद देतात.

मी अजूनही उपायाची आशा सोडलेली नाही. पण आता मी त्या दुःखाला कवटाळून बसत नाही. मी माझ्या शाळेतली आणि कॉलेजची मोलाची वर्षं एलोपेशियामुळे दुःखात काढली आहेत. पण आता नाही. मी आता आयुष्य भरभरून जगते आहे, असं अंकिता म्हणते! तिच्या धैर्याला सलाम.

मला आठवतंय, मी शाळेत असताना दुस-या तुकडीत एक मुलगी होती. तिचेही अचानक केस गळायला लागले होते. ती स्कार्फ बांधून शाळेत यायची. आम्ही सगळ्याजणी आपापसात त्यावर किती चर्चा करायचो. पण त्या वयात तिला किती वाईट वाटत असेल हे आता कळतंय.

खरं तर केस ही बाह्य सौंदर्यासाठी आवश्यक मानली गेलेली गोष्ट. पण खरोखर त्यानं काही फरक पडतो? आणि पडावा का?

सायली राजाध्यक्ष

(ही पोस्ट मुंबई मिररमधल्या स्टोरीवर आधारीत आहे.)