की आणि का

स्त्री-पुरूष समानता या विषयावरची चर्चा ही अखंड तेवत असलेल्या नंदादीपासारखी आहे. म्हणजे या चर्चेला काहीही अंत नाही. असं का? जग आज एकविसाव्या शतकात असतानाही बायकांना पुरूषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं किंवा मिळतं आहे की नाही यावर अविरत चर्चा घडत असतात. जगात बहुतांश ठिकाणी आजही पुरूषसत्ताक पद्धती आहे. पाश्चिमात्य देशातल्या स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आज बायकांची परिस्थिती बरीच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तीही मध्यमवर्गीय घरातल्या सुशिक्षित बायकांची. निम्न आर्थिक स्तरातल्या कितीतरी बायका अजूनही माणूस म्हणून जगायचा अधिकार मिळवण्यासाठी झगडत आहेत.

स्त्रीपुरूषांच्या मुळातल्याच शारिरीक फरकामुळे पुरूष हा स्त्रीपेक्षा वरचढ आहे असा प्रचार सुरूवातीच्या काळात केला गेला. अजूनही काहीजण करतात. हाच युक्तिवाद लावायचा झाला तर शारिरीकदृष्ट्या बळकट असलेले पुरूष दुर्बलांपेक्षा वरचढ किंवा तरूण मुलं वयस्कर लोकांपेक्षा वरचढ असाही लावता येईल. पण त्यात खरंच तथ्य आहे का? जर आजच्या काळात एखाद्या उत्तम शिक्षण घेतलेल्या पुरूषाला वाटलं की आपली बायको नोकरी करते आहे तर आपण घर सांभाळावं तर त्यात काही चूक आहे का? मला तरी त्यात काही चूक वाटत नाही. पण आपल्याकडे लोक अजूनही या गोष्टीकडे विचित्र नजरेनं बघतात. कारण मुळातच घरात राहून घर सांभाळणारी व्यक्ती ही कमी दर्जाची असं समजलं जातं. आपल्याकडे ही व्यक्ती म्हणजे बाईच असते. त्यामुळे गृहिणी असलेल्या बाईला हिणवायची पद्धत आहे.

गृहिणी म्हणून राहण्याचा पर्याय स्वीकारणा-या बायका त्याकडे कशा दृष्टीनं बघतात हेही पाहायला लागेल. आता आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये कामाला बायका असतात. त्यामुळे अर्थातच शारिरीक श्रमांचा भार खूपच कमी होतो. मग हा जो वेळ मिळतो तो आपण कसा घालवतो हेही महत्वाचं आहे. आपण फक्त टीव्ही बघण्यात वेळ घालवणार आहोत का? की कुचाळक्या करण्यात? काही घरांमध्ये नव-यांच्या नोक-या अशा असतात की सतत दुस-या गावी राहावं लागतं. किंवा सतत फिरतीवर जावं लागतं. किंवा येण्याजाण्याच्या वेळा विचित्र असतात. अशा घरांमध्ये कधी स्वेच्छेनं किवा कधी सक्तीनं बाईला घरात राहावं लागतं. कधी घरात वयस्कर, आजारी माणसं असतात. अशावेळी जर बाई घरी राहात असेल तर तिला हिणवण्यात काही अर्थ नाही. पण घरी राहण्याचं काम पुरूष करत असेल तर त्यालाही हिणवण्यात काही अर्थ नाही.

मुळात नवराबायकोंनी आपल्या सहजीवनाबद्दल काय निर्णय घेतले आहेत ते त्यांचं त्यांना माहीत असतं. त्यांचा न्यायनिवाडा करण्याचा हक्क इतरांना नाहीच. जर बायकोचं करियर उत्तम असेल तर नव-यानं बॅकसीट घेतली तर काय बिघडतं? किंवा उलटही. मध्यंतरी मी वाचलं होतं, टीव्हीवरचा एक ब-यापैकी ओळख असलेला एक अभिनेता बायकोला दोन वर्षांसाठी कॅनडाला चांगली असाइनमेंट मिळाली म्हणून चक्क ब्रेक घेऊन मुलाला सांभाळायला गेला. तर असेही सकारामत्मक बदल हळूहळू का होईना होताहेत. आज घरातल्या जबाबदा-या बरोबरीनं पार पडण्यासाठी पुरूषही तयार असलेले दिसतात.

की आणि का हा चित्रपट याच सगळ्या मुद्द्यांचा ऊहापोह करतो. उत्तम शिकलेला पण घर सांभाळण्याची इच्छा असलेला नवरा आणि त्याची करियरिस्ट बायको यांच्या सहजीवनाची गोष्ट या सिनेमात आहे. नवरा बायकोहून तीन वर्षांनी लहान आहे. त्याचे वडील खूप श्रीमंत आहेत पण त्यांच्या पैशात त्याला काडीचाही रस नाही. तर नायिका अगदी स्त्रीवादी आईबरोबर वाढलेली आहे. लग्न हा तिला आपल्या करियरमधला अडथळा वाटतो. दोघेही यापूर्वी रिलेशनशिप्सचा अनुभव घेतलेले आहेत. दोघांनाही एकमेकांच्या विचारांची पूर्ण माहिती आहे. दोघेही कुठल्या स्वप्नात वावरत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर दोघे लग्नाचा निर्णय घेतात. ते करतातही. लग्नानंतर नवरा घराची पूर्ण जबाबदारी घेतो. एखाद्या गृहिणीसारखा स्वयंपाक करतो, डबे करतो, घराची व्यवस्था बघतो, घरात हवंनको बघतो. नायिका आपल्या करियरमध्ये मश्गुल आहे. सगळं उत्तम चाललेलं असतं.

आणि एक दिवस नव-याला कुकरी शोमध्ये बोलावणं येतं. तो हाऊस हजबंड म्हणून राहतो याबद्दल त्याच्या मुलाखती होतात. त्याला प्रसिद्धी मिळायला लागते. आणि बायको बिथरते. तिला त्याला मिळणारी प्रसिद्धी, त्याच्यावरचा प्रकाशझोत सहन होत नाही. त्यांच्यात वादविवाद होतात. थोडक्यात ती वाद घालते तो सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. नंतर एका प्रसंगानंतर एकमेकांना सोडून जायची वेळ येते आणि अर्थातच शेवटी सगळं गोड होतं.

चित्रपटातली ही परिस्थिती समाजातलं प्रत्यक्ष वास्तव म्हणून समोर यायला कदाचित काही वेळ जावा लागेल. पण ही भविष्यातली एक परिस्थिती असू शकते. जसं बाईनं घरी राहाणं कमी झालंय, जसं मुलं न होऊ देणा-या जोडप्यांची संख्या वाढते आहे, जसं करियरिस्ट नवराबायको आणि पूर्णपणे घरातल्या मदतनीसांच्या जीवावर वाढणा-या मुलांची संख्या वाढते आहे, तसंच हेही एक वास्तव आहे. तरूण पिढीतली मुलं ही कमी जजमेंटल आहेत. ते निष्कर्ष काढण्यापेक्षा त्याचा सांगोपांग विचार करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचा अशा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खुला आहे. त्यांना त्यात वावगं वाटत नाही. आणि यात वावगं वाटण्यासारखं काही नाहीही.

स्त्री आणि पुरूष ही संसाररथाची दोन चाकं आहेत वगैरे म्हणण्याचा काळ गेला. पण बाईनं आणि पुरूषानं सामंजस्यानं नांदावं (अगदी संसारातच नव्हे!) असा विचार बाळगायला काहीच हरकत नाही.

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s