काजळ आणि लिपस्टिक

मी पूर्वीही लिहिलं होतं की काजळ आणि लिपस्टीक वगळता मी दुसरा कुठलाही मेकअप वापरत नाही. काजळ मात्र मी आठवी-नववीत असल्यापासून वापरतेय. सुरूवातीला बरीच वर्षं जाई काजळ वापरायचे. नंतर गाला किंवा लॅक्मेचं आयलायनर काजळासारखं लावायचे. नंतर काही वर्षं शहनाजचं हर्बल काजळ वापरलं. नंतर जेव्हा लॅक्मेच्या आयपेन्सिल आल्या तेव्हा त्या वापरल्या.

हे सगळं मी का लिहिते आहे? तर अनेक मैत्रिणींनी मी कुठलं काजळ वापरते असं विचारलं आहे आणि ते पसरत नाही का असंही. बहुतेकदा मी लॅक्मेची रोल ऑन काजळ पेन्सिल वापरते. पण ती मिळाली नाही तर शेंबोर, रेवलॉन, मेबलाइन अशी जी मिळेल ती आयपेन्सिल वापरते. या सगळ्या आयपेन्सिल्स साधारणपणे सारख्याच आहेत. या आयपेन्सिलनं लावलेलं काजळ पसरत नाही. मेबलाइनचं क्रीमबेस्ड काजळ पण मिळतं तेही छान गडद रंगाचं असतं आणि तेही पसरत नाही. फेसेसची साधी आयपेन्सिल (रोल ऑन नाही) छान गडद आहे. पण का कोण जाणे ती लावली की माझ्या डोळ्यात पाणी येतं, त्यामुळे मला ती आवडत असूनही मला ती वापरता येत नाही. या सगळ्या आयपेन्सिल्स लावताना एकदम मृदू असतात आणि लावल्यानंतर काहीवेळानं काजळ वाळून जातं, त्यामुळे ते पसरत नाही.

या सगळ्या आयपेन्सिल काजळ म्हणून वापरता येतातच पण त्याचबरोबर त्या आयलायनर म्हणूनही वापरता येतात. मला स्वतःला मेकपचं अजिबातच ज्ञान नाही. त्यामुळे मी डोळ्यांचा मेकअप कसा करावा याबद्दल शास्त्रशुद्धपणे काही सांगू शकत नाही. पण डोळ्यांच्या वर आणि खाली असं दोन्हीकडे भरमसाठ काजळ आणि आयलायनर लावलं तर डोळे बटबटीत दिसतात असं आपलं मला वाटतं. त्यामुळे एकतर आयलायनर गडद लावून काजळाची पातळ रेघ लावलीत तर किंवा उलटं केलंत तर जास्त चांगलं दिसतं असं मला वाटतं. मी आयलायनर लावतच नाही, मी फक्त खालच्या बाजूला काजळ लावते. आयशॅडो, मस्कारा हे दोन्हीही मी वापरत नसल्यामुळे मी त्याबद्दल काही सांगू शकणार नाही.

लिपस्टिक ही अशी गोष्ट आहे की रंगसंगतीचं ब-यापैकी ज्ञान असूनही मला आजतागायत लिपस्टिक कशी घ्यावी हे कळलेलं नाहीये. पूर्वी कॉलेजमध्ये असताना किंवा त्यानंतरही मला गडद मरून, ब्राऊन रंगांच्या लिपस्टिक आवडायच्या. तेव्हा त्या रंगांची चलतीही होती. मला ते रंग चांगले दिसतात की नाही याचा विचार न करता मी त्या रंगांच्या लिपस्टिक्स वापरत असे. नंतर मधला काळ असा होता की मी लिपस्टिक वापरणं पूर्णपणे बंद केलं होतं. कारण काहीच नव्हतं पण कंटाळा आला होता. नंतरच्या काळात मी ज्या लिपस्टिक्स वापरायचे त्या अगदीच सौम्य, हलक्या रंगाच्या होत्या. मी न्यूड शेड्स वापरत असे. हल्ली हल्ली मुलीनं बोलून बोलून मला गडद रंगाच्या लिपस्टिक्स घ्यायला लावल्या आहेत. मी त्या क्वचित लावते आणि थोड्यावेळानं फारच डार्क दिसतंय म्हणून पुसून टाकते. अर्थात मुळात मी लिपस्टिक फार कमीदा लावते.

सध्या भडक लाल, केशरी, पीच, राणी या रंगांची चलती आहे. पण मला स्वतःला यातली एकही लिपस्टिक चांगली दिसत नाही असं माझं मत आहे. मुळात मला हे सगळे रंग ओठांवर फारच भडक वाटतात. त्यात पुन्हा त्या ग्लॉसी असतील तर अजूनच भडक वाटतात. अनेकजणी आपल्याला कुठला रंग शोभेल हे लक्षात न घेता केवळ फॅशन आहे म्हणून या रंगांच्या लिपस्टिक घेतात. पण आपण त्या कुठल्या रंगाच्या, कुठल्या प्रकारच्या, कुठल्या पोताच्या कपड्यावर लावणार आहोत याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. रेशमी किंवा तत्सम ग्लॉसी कपड्यांवर फार मॅट फिनिशची लिपस्टिक लावण्याऐवजी जराशी ग्लॉसी लिपस्टिक चांगली दिसेल असं मला वाटतं. शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला रंग कुठला आहे हीही आहेच.

हे आपलं मी मला काय वाटतं हे सांगितलंय. हल्ली कितीतरी तरूण मुलींना या विषयातलं चांगलं कळतं. आणि त्या जे काही वापरतात ते त्यांना छान शोभूनही दिसतं. त्यामुळे आपल्याला काय बरं दिसतं आणि आपल्याला काय आरामदायी वाटतं हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा.

रोज रात्री झोपताना काजळ किंवा लिपस्टिक पूर्णपणे पुसून झोपा. कारण या दोन्हींमध्ये केमिकल्स असतात. ते काढायला तुम्ही मेकअप रिमूव्हर वापरा, बेबी ऑईल वापरा किंवा मग साधं व्हॅसलिन वापरा.

आज इतकंच.

सायली राजाध्यक्ष