हितगूज

आजची पोस्ट खास मैत्रिणींसाठी आणि त्या मित्रांसाठीही ज्यांना आपल्या मैत्रिणीची, बायकोची, आईची, बहिणीची, मुलीची काळजी आहे.

मी आता पंचेचाळीस वर्षांची आहे. माझ्या आईच्या माहेरी डायबेटिसची स्ट्राँग हिस्टरी आहे. अनेक वर्षं स्थिर असलेलं माझं वजन गेल्या वर्षभरात ५-६ किलो वाढलं आहे. शिवाय केसही गळत होते आणि कधीही झोप येत होती. म्हणून काही वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या. त्यात शुगर, कोलेस्टरॉल, थायरॉईड या सगळ्या टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल आले. पण जी टेस्ट नॉर्मलच असणार याची खात्री होती ती म्हणजे हिमोग्लोबिन, ती नॉर्मल नव्हती. माझं हिमोग्लोबिन चक्क कमी झालेलं आहे. उत्तम आहार घेऊनही ते कमी झालं आहे. आजतागायत फक्त एकदा हिमोग्लोबिन कमी झाल्याचं मला आठवतंय. याचं कारण म्हणजे प्री-मेनोपॉजल बदल असावेत.

मी मुळात शाकाहारी असले तरी भाज्या आणि फळं भरपूर खाण्याची सवय लहानपणापासून आहे. त्यामुळे अनिमियाचा त्रास कधीच झाला नाही. आता डॉक्टरांनी आयर्न घ्यायला सांगितलंय आणि एकदा हिमोग्लोबिन कमी आहे म्हटल्यावर आहारात अजून पालेभाज्या, फळं, खजूर, बेदाणे, अंजीर, नाचणी हे सगळं जास्त घेईनच. ते येईल पुन्हा मूळपदावर.

पण यावरून मला ही पोस्ट लिहाविशी वाटली. याचं कारण असं की आपल्याकडे अनेक बायका आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाहीत. नीट खात पित नाहीत. घरातल्या इतर सदस्यांच्या खाण्यापिण्याकडे काळजीनं लक्ष देणारी गृहिणी आपल्या तब्येतीकडे मात्र लक्ष देत नसते. नीट नाश्ता, व्यवस्थित जेवण, फळं खाणं हे प्रत्येकानं केलंच पाहिजे. अनेक बायकांना पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होतो, त्यांचं हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता असते. त्यांनी तर आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं, रक्त तपासायला हवं.

विशीच्या पुढच्या सगळ्या बायकांनी दर महिन्याला पाळीच्या नंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ( दिवस लक्षात राहावा म्हणून असा एखादा दिवस ठरवावा ) स्व-स्तन तपासणी करायला हवी. स्तनांमध्ये काही बदल आढळला तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवायला हवं. स्व-स्तन तपासणीमुळे ब्रेस्ट कॅन्सर टाळता येतो असं नाही. पण जर स्तनात काही बदल झाले असतील तर ते लवकर लक्षात येऊ शकतात. शिवाय पाळीच्या आधी स्तनांमध्ये काही बदल होतात, त्यामुळे ही तपासणी पाळीनंतर करावी.

याशिवाय तिशीनंतर आपल्या जेवणात दुग्धजन्य पदार्थ असावेतच. नेहमीच असावेत. पण तिशीनंतर बायकांच्या जेवणात तर असावेतच. जर मांसाहार करत नसाल तर मग आवश्यकच आहे. दुग्धजन्य पदार्थातून कॅल्शियम मिळतं. कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याऐवजी ते आहारातून मिळवणं कधीही चांगलं. त्यासाठी दूध, दही, ताक, पनीर, चीज यांचा आहारात समावेश असावाच. अजून एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. आयर्न सप्लिमेंट्स घेत असताना आहारात लिंबू, संत्री अशा व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी आवर्जून घ्या. कॅल्शियम शरीरात शोषलं जावं म्हणून व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे. व्यायाम न करता कॅल्शियमच्या नुसत्या गोळ्या घेऊन शरीराला तितकासा फायदा होत नाही हे लक्षात ठेवायला हवं.

घरात डायबेटिसची हिस्टरी असेल तर चाळीशीनंतर दरवर्षी रक्तातली साखर तपासून घ्या. बाकी कुठल्याही तपासण्या करण्याआधी डॉक्टरांशी बोलून मगच त्या तपासण्या करा. उगाचच हॉस्पिटलमधली हेल्थ पॅकेजेस बघून तपासण्या करू नका. त्यातल्या कित्येक तपासण्या सरसकट करण्याची गरज नसते.

ही पोस्ट स्त्रियांसाठीच का? तर बायकांच्या शरीरात पुरूषांपेक्षा जास्त घडामोडी होत असतात. मासिक पाळी, त्याआधीचे बदल, गरोदरपणा, बाळंतपण, रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज अशा सगळ्या शारिरीक बदलांना प्रत्येक बाई सहज तोंड देत असते. हे बदल नैसर्गिक असले तरी या प्रक्रियांमध्ये होणा-या बदलांमुळे शरीराची जी हानी होत असते ती भरून काढणं गरजेचं आहे.

मग थोडक्यात काय तर खालचे काही मुद्दे लक्षात ठेवा.

रोज नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण नीट आणि वेळेवर घ्या. रोज निदान दोन फळं खा. फळांचे रस न घेता चोथ्यासकट फळं खा.

आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

महिन्यातून एकदा स्व-स्तन तपासणी कराच.

आठवड्यातून ५-६ दिवस ३०-४५ मिनिटं व्यायाम करा. चालणं, पळणं, सायकलिंग, जिने चढणं-उतरणं, स्विमिंग असा कुठलाही व्यायाम करा.

पॉवर योगानं एरोबिक (हृदयाला व्यायाम होणारा) व्यायाम होतो. पण साध्या योगासनांनी फक्त स्ट्रेचिंग-बेंडिंग होतं. साध्या योगासनांनी वजन कमी होत नाही.

वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट न करता, समतोल आहार आणि व्यायाम यांचा अवलंब करा.

चाळीशीनंतर हिमोग्लोबिन आणि डायबेटिस या दोन गोष्टींसाठी निदान वर्षातून एकदा रक्त तपासणी करा. इतर तपासण्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नका.

मॅमोग्राफीसारख्या, ज्यात रेडिएशन आहे अशा तपासण्या तर डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय मुळीच करू नका.

पाळीमध्ये काही अनाकलनीय बदल वाटले तर ताबडतोब गायनाकॉलॉजिस्टला भेटा. त्यांनी जर काही तपासण्या करायला सांगितल्या तर त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब तपासण्या करा.

आणि सगळ्यात महत्त्वाचं, महिन्यातून एकदा आपल्या आवडत्या मित्रमैत्रिणींना भेटा. त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारा, खा-प्या, खूप हसा. ही सगळ्यात उत्तम थेरपी आहे.

विशेष सूचना – मी आहार तज्ज्ञ, व्यायाम तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ नाही याची कृपया नोंद घ्यावी. या सगळ्या गोष्टी कॉमन सेन्सच्या आहेत. वाचनातून, अनुभवातून समजलेल्या आहेत. त्या तुमच्याबरोबर शेअर करते आहे.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#healthiswealth #womanhealth #हेल्थइजवेल्थ #स्त्रीआरोग्य

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s