पांढरे केस आणि मी

आपण चांगलं दिसावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं आणि त्यात काहीही चूक नाही. त्यामुळे बहुतेक सगळी माणसं नेहमी चांगलं दिसण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात प्रत्येक व्यक्तीची चांगलं दिसण्याची व्याख्या वेगळी असते. त्यामुळे एखाद्याला जे चांगलं वाटतंय ते दुस-याला चांगलं वाटेलच असं नाही.

वाढणारं वय हे वास्तव आहे. आपलं सगळ्यांचंच वय वाढणारच आहे म्हणूनच तर जन्मदिवसाला वाढदिवस असंच म्हटलं जातं. वाढणारं वय आपण कसं स्विकारतो हा खरा प्रश्न आहे. लहान असताना वय वाढावं असं वाटत असतं कारण तारूण्याची कल्पना विलोभनीय वाटत असते. आणि ते खरंही आहे. तरूण असण्यातली मजा काही औरच आहे. या वयात माणूस दिसतोही छान, बेफिकिर असतो, कसल्या चिंता नसतात, आईवडील धडधाकट असतात, त्यामुळे सगळं कसं छान वाटत असतं. पण नंतर जसजसं वय वाढायला लागतं तसंतसं काहींना ते नकोसं वाटायला लागतं. आणि या नकोशा वाटण्यामागे सगळ्यात अग्रक्रमावर असतं ते दिसणं.

वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर दिसायला लागल्या की पहिल्यांदा सैरभैर व्हायला होतं. केस पांढरे दिसायला लागतात, मानेवर, हातावर सुरकुत्या दिसायला लागतात. तरूणपणातला उत्फुलपणा कमी व्हायला लागतो. हे सगळं पचवणं खूप अवघड आहे असं नाही म्हणणार मी. पण बरेचदा ते नकोसं मात्र होतं. मग वय लपवण्याचे वेगवेगळे उपाय केले जातात.

हे मी का लिहिते आहे असं तुम्हाला वाटत असेल. तर अनेक लोक मला मी केस पांढरे ठेवल्याबद्दल compliment देतात, केस पांढरे ठेवण्याची हिंमत कशी काय झाली असं विचारतात. म्हणून हे लिहिण्याचा विचार माझ्या मनात आला. केसांचा पांढरेपणा हा बरेचदा आनुवंशिक असतो. आपल्या आईवडीलांचे केस कसे आहेत त्यावर आपले केस अवलंबून असतात. माझ्या आईचे केस फार लवकर पांढरे झाले. माझे केसही लवकर पांढरे व्हायला लागले. कॉलेजमध्येसुद्धा माझे काही केस पांढरे होते. नंतर जेव्हा ते जास्त पांढरे दिसायला लागले तेव्हा मी मेंदी लावायला सुरूवात केली. काही वर्षं मेंदी लावली. पण जसजसे केस जास्त पांढरे झाले तसतसे ते मेंदीमुळे लाल दिसायला लागले. म्हणून केसांना रंग लावायला सुरूवात केली. काही वर्षं रंग लावला. पण नंतर त्याचा कंटाळा यायला लागला. त्याचं कारण असं होतं की कितीदाही सांगून पार्लरमधले लोक केस काळेभोर करायचे. माझे केस मुळात भुरे होते. त्यामुळे मला ते फारच कसंसं वाटायचं. शिवाय मी केस कापणं आणि केस रंगवणं या दोन गोष्टी सोडल्या तर पार्लरमध्ये काहीही करत नाही. मग असं असताना मला केसांना रंग लावायला दर महिन्यात जायला आणि तिथे बसून राहायला कंटाळा यायला लागला. मी वयाच्या ४५ वर्षापर्यंतच केस रंगवणार असं मी फार पूर्वीच ठरवलं होतं. कारण केस रंगवल्यानं तुमचं वय लपत तर नाहीच पण एका विशिष्ट वयानंतर ते वाईटही दिसतं असं माझं मत आहे. पण मी ४० वर्षांची झाले आणि कंटाळून केसांना रंग लावणं बंद करून टाकलं.

केस रंगवणं बंद केल्यानंतर वर्षभराचा काळ हा फार पेशंटली काढावा लागतो. कारण रंग बंद केल्यामुळे केसांची मूळं पांढरी दिसायला लागतात आणि खालचे केस मात्र काळे कुळकुळीत. सुदैवानं माझे केस भुरे असल्यानं तितकासा फरक दिसला नाही. मात्र जसजसे केस वाढायला लागले तसतसे ते विचित्र दिसायला लागले. सगळे लोक विचारायचे की रंगवत का नाहीयेस. हा काळ सहनशक्तीची परीक्षा पाहणारा होता. विशेषतः कुठल्या समारंभाला गेलं किंवा लग्नांना की कसंतरी वाटायचं. छान साडी नेसलेली, दागिने घातलेले, मात्र केस फार विचित्र दिसायचे. पण अतिशय चिकाटीनं वर्ष काढलं.

सुरूवातीच्या काळात केसांमध्ये हायलाइट्स केले. त्यामुळे जरा वेगळा लूक मिळाला. हळुहळू बघणा-यांनाही सवय होत गेली. केस वाढले तसे ते एकसारखे दिसायला लागले. माझ्या मुलींना सुरूवातीला मी केस रंगवणं थांबवणं पसंत नव्हतं. पण नंतर एकदा शर्वरी म्हणाली की, आई, तुझे केस पांढरे आहेत हे आता लक्षातही येत नाही. तेव्हा मी तिला म्हटलं की अगं सवयीचा भाग असतो तो.

केस रंगवणं थांबवल्यावर माझ्या केसांचा पोत सुधारला. सुधारला म्हणण्यापेक्षा तो पूर्ववत झाला. मुळात माझे केस मऊ, रेशमी पोताचे होते. मेंदी आणि रंग यामुळे ते खरखरीत, रखरखीत झाले होते. ते पुन्हा मऊ व्हायला लागले. केस खूप गळत होते, ते गळणं कमी झालं. मग केस जरा वाढवले. पण पातळ झाल्यामुळे आता मी खांद्यापर्यंत केस ठेवले आहेत. पांढरे केस लहान ठेवले तर फार स्मार्ट दिसतात. पण मला सतत मोकळे केस ठेवून वावरता येत नाही म्हणून बांधता येतील इतपत लांबी मी ठेवते.

हे मी का लिहिलं? तर केवळ माझा अनुभव शेअर करण्यासाठी. तुम्हीही असंच करावं असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण जर कुणाला केस रंगवणं थांबवायची इच्छा असेल तर त्याला या अनुभवाचा उपयोग होईल असं वाटलं म्हणून हे लिहिते आहे. शेवटी प्रत्येकाची चांगलं दिसण्याची कल्पना सापेक्ष आहे.

आणखी एक आवर्जून सांगावंसं वाटतं. वय वाढलं म्हणजे कसंही गबाळं राहावं असं मला अजिबात वाटत नाही. आपल्या वयाला, व्यक्तिमत्वाला, राहणीमानाला जे चांगलं दिसेल, शोभेल ते नक्की करावं. प्रत्येक वयाचं खास असं सौंदर्य असतं. जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी बघा, पांढ-या केसांमध्ये आणि सुरकुतलेल्या चेह-यामध्येही किती छान दिसायच्या. आपल्या स्वभावाचं प्रतिबिंब आपल्या चेह-यावर लगेचच दिसतं. खूप रेखीव नाकडोळे असलेली व्यक्ती स्वभावानं खडूस असेल तर ते लगेचच चेह-यावर दिसतं. त्याउलट नाकीडोळी लौकिकार्थानं चांगली नसलेली व्यक्ती स्वभावानं गोड असेल तर तो गोडवा तिच्या चेह-यावर उमलून येतो. तेव्हा छान रहा, आनंदी रहा, छान दिसा!

सायली राजाध्यक्ष