तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा पारंपरिक पोशाख म्हणजे साडी आणि परकर पोलकं. मला आठवतंय आम्ही बीडला राहायचो तेव्हा शाळेतल्या तसंच नात्यातल्या मुलींना परकर पोलक्यात बघायची सवय होती. आणि लहानपणापासून मी हे कधीही घालणार नाही असंही मनोमन ठरवलेलं आठवतंय. सुदैवानं आई आणि बाबांनी लहानपणापासून उत्तम कपडे घालायला शिकवलं. बाबा तर पुण्याला गेले की स्कर्ट किंवा फ्रॉक आणायचे. आईसुद्धा टेलरकडून छानसे फ्रॉक किंवा पिनाफोर शिवून घ्यायची. मी अकरावीत गेल्यावर कॉलेजला जाणार म्हणून आईबाबांनी खास पुण्याहून २-३ फ्रॉक, २ स्कर्ट, २-३ पँट आणि १ लखनवी सलवार-कमीज आणलं होतं.

तर सांगण्याचा मुद्दा असा की हळुहळू भारतातल्या सगळ्याच प्रांतांनी आपापले पारंपरिक पोशाख सोडून पंजाबी सलवार कमीजला आपलंसं केलं. आता भारतातल्या सरसकट बायका प्रामुख्यानं सलवार कमीज घालतात. एकतर हा पोशाख वापरायला अतिशय सोयीचा आहे. तो अंगभर असतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या हवामानात वापरणं योग्य आहे. शिवाय अनेक बायका व्यायाम करतानाही तो वापरू शकतात इतका तो बहुगुणी आहे. म्हणजे ऑफिसपासून ते भाजी आणायला, समारंभांना, ते व्यायाम करण्यापर्यंत सलवार कमीज हा पोशाख अनेकांना सुटसुटीत वाटतो.

सलवार कमीज वापरताना आपल्याला निवड करण्याचे पर्याय खूप असतात. म्हणजे कमीजबरोबर सलवार घाला किंवा चुडीदार. पुन्हा सलवारमध्ये पतियाळा, धोती, साधी असे पर्याय असतातच. चुडीदार म्हटलं तर खूप चुण्या असलेला किंवा सरळसोट लेगिंग्ज किंवा अँकललेन्ग्थ लेगिंग्ज असे पर्याय असतात. शिवाय बरोबर दुप्पटा घ्या, स्टोल घ्या किंवा काहीही घेऊ नका असंही करता येतं. त्यामुळेच हा प्रकार इतका लोकप्रिय आहे असं मला वाटतं.

मला स्वतःला मात्र सलवार कमीज फारसं आवडत नाही. त्यापेक्षा मी कुडते किंवा कुर्ती वापरण्याचा पर्याय निवडते. मला कुडत्याचा फायदा असा वाटतो की कुडत्यामध्ये इतके पर्याय मिळू शकतात की बस. एक अगदी साध्या शर्टाच्या लांबीचा पासून ते अगदी पायापर्यंत कुठल्याही लांबीचे कुडते तुम्ही शिवू शकता. लांबी तुमच्या मनासारखी कशीही आणि कितीही ठेवली तरी ते वाईट दिसत नाही. फक्त त्यावर खाली काय घालावं ते मात्र जरा नीट लक्ष देऊन निवडलं तर त्यासारखा उत्तम पोशाख नाही. म्हणजे शर्टच्या लांबीचा किंवा त्याहून लहान लांबीचा कुडता असेल तर त्यावर स्ट्रेट कट, जराशी सैलसर पँट घालावी. अगदी स्किनी पँट यावर मला तरी आवडत नाही. जर नी लेंग्थ कुडता असेल तर मग त्यावर जरा अंगासरशी बसणारी पँट किंवा स्ट्रेट कट कॉटन पँट चांगली दिसते. त्याहून लांब कुडत्यावर पेन्सिल पँट, स्किनी पँट, लेगिंग्ज असं काहीही चांगलं दिसतं. शॉर्ट्स घातल्यात तर त्यावर नी लेंग्थ कुडते मस्त दिसतात. पोट-यांपर्यंतचे लेगिंग्ज आणि लखनवी कुडते सुरेख दिसतात.

हल्ली अगदी लांब कुडते अनेक प्रकारांनी वापरायची पद्धत आहे. म्हणजे कधी असे कुडते जीन्सवर घालता येतात, कधी स्कर्टवर घालता येतात. जर स्लीट नसेल तर असे कुडते ड्रेस म्हणून वापरता येतात. कधी पेन्सिल पँटवर घालता येतात तर कधी पलाझोवर घालता येतात. कधीकधी अगदी पायघोळ स्ट्रेट कुटता किंवा अनारकली शिवून त्यात लेगिंग्ज घालता येतात. बघितलं तर ते वनपीस ड्रेससारखे दिसतात. थोडक्यात कुडता हा प्रकार अनेक पद्धतींनी वापरता येतो.

एकदा आपल्याला कशा प्रकारचा कुडता घालायचा आहे आणि त्याखाली काय घालायचं आहे हे निश्चित झालं की मग त्यावरच्या अक्सेसरीज निवडता येतात. म्हणजे नेहमीच्या शर्टच्या लांबीचा कुडता असेल आणि त्याखाली जीन्स घातली असेल तर त्यावर साधेसे कुठलेही इयररिंग्ज चांगले दिसतात. हा अगदीच कॅज्युअल पोशाख आहे त्यामुळे त्याला फार काही करायची गरज नसते. नी लेंग्थ कुडता असेल आणि खाली पँट घातलेली असेल तर बरोबर एखादा मॅचिंग स्टोल घेतला की छान दिसतं. अशावेळी फक्त इयररिंग्ज घालता येतात. किंवा एथनिक प्रिंटचा कुडता असेल तर त्यावर एखादी स्टेटमेंट नोझपिन आणि गळ्यातलं घालता येतं. अगदी लांब स्ट्रेट कट कुडता असेल तर त्यावर लांब नेकपीस उत्तम दिसतो. हल्ली शर्ट कॉलरचा लांब कुडता आणि त्यावर स्टेटमेंट नेकपीस घालायची पद्धत आहे. जरा ड्रेससदृश कुडता असेल तर त्यावर गळ्यातलं, कानातलं आणि नाकातलं असं तिन्ही चांगलं दिसतं. फक्त दागिने निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हल्ली मिनिमलिस्टिक फॅशनची पद्धत आहे. म्हणजे मोठं गळ्यातलं घातलं तर मोठं कानातलं घालू नका. किंवा मोठी नोझपिन घातली तर गळ्यात घाला पण कानात घालू नका किंवा अगदी बारीक स्टड्स घाला. किंवा फक्त गळ्यात लांब नेकपीस आणि हातात एखादी मोठी अंगठी घाला. अंगठी घातली तर बांगड्या किंवा ब्रेसलेट घालू नका. काहीजणांना हे सगळं घालूनही छान दिसतं, पण प्रत्येकाला ते शोभत नाही. आणि आपल्याला काय शोभतं हे सवयीनं आपल्याला नक्कीच कळतं.

कुडत्याची लांबी निवडताना काही नियम पाळा. फार बारीक आणि बुटक्या किंवा फार जाड आणि बुटक्या स्त्रियांनी फार लहान किंवा फार लांबीचे कुडते वापरू नयेत. त्यांनी शर्टच्या लांबीचे किंवा नी लेंग्थ कुडते वापरावेत. फार उंच स्त्रियांना लांब कुडते उत्तम दिसतात शिवाय ड्रेससारखे कुडतेही छान दिसतात. त्यांना पलाझो फार बरे दिसत नाहीत असं माझं मत आहे. मध्यम उंचीच्या स्त्रियांना सगळ्या पद्धतीचे कुडते वापरता येतात. अर्थात हे ढोबळ ठोकताळे आहेत. अनेकजण आपल्या शारीरिक त्रुटींवर मात करून फार छान दिसतात. आणि पुन्हा शेवटी, आपल्याला विशिष्ट प्रकारचेच कुडते मनापासून आवडत असतील तर मग खुशाल घालावेत. शेवटी आपला आनंद महत्त्वाचा. आणि आपण करू ती फॅशन हाच आपला मंत्र असावा, नाही का!

मग ही पोस्ट कशी वाटली ते जरूर कळवा. सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#kurti #simpleliving #simplefashion #minimalisticfashion #sareesandotherstories #साधीफॅशन #मिनिमलिस्टिकफॅशन #साधीराहणी #कुडता #कुर्ती

सायली राजाध्यक्ष