कपाट लावणं

कपड्यांची कपाट आवरायची म्हटलं की अंगावर काटा येतो, हो ना? याचं कारण असं आहे की आपण कपडे भाराभर घेत असतो. त्यांचे तसेच ढीग करत असतो. मग वेळ होईल तसे ते जमतील तसे लावत असतो. मीही पूर्वी असंच करत असे. पण आता गेली काही वर्षं मी महिन्यातून एकदा कपाट आवरायची सवय लावून घेतली आहे.

कपड्यांचं कपाट रेडीमेड विकत घेताना किंवा बनवून घेतानाही ते आपल्या सोयीनं बनवून घ्यावं. म्हणजे आपण कुठल्या प्रकारचे कपडे वापरतो, त्या कपड्यांच्या घड्या कशा असतात, त्यांची जाडी कितपत असते यासारख्या गोष्टींचा विचार करावा. माझं स्वतःचं मत असं आहे की कपाटात कप्पे जास्त मोकळे ढाकळे ठेवावेत म्हणजे आपल्याला त्यात हवे तसे कपडे लावता येतात.

माझ्या कपाटात कप्पे असेच मोकळे ठेवलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हवे तसे कपड्यांचे गठ्ठे ठेवता येतात. कपाटात आतल्या कपड्यांसाठीचा वेगळा ड्रॉवर असला पाहिजे. म्हणजे त्या कपड्यांची सरमिसळ होणार नाही. शिवाय माझ्या कपाटात एक माझ्या जुलरीसाठीचा ड्रॉवरही आहे.

मी स्वतः रोज पँट्स आणि कुडते वापरते. अधूनमधून स्कर्ट, लाँग ड्रेसही वापरते. सलवार कमीज फारच कमी वापरते. पण पँट आणि कुडत्यावर स्टोल घेते. त्यामुळे माझ्या कपाटात मी कपडे याच क्रमानं लावते. कपाट उघडल्यावर समोर दिसतील अशा कप्प्यांमध्ये पँट्स आणि कुडते ठेवलेले असतात. शिवाय योगासनांच्या क्लाससाठी लागणारे कुडते आणि टाइट्सही समोर दिसतील असेच ठेवलेले असतात. वरच्या कप्प्यात स्कर्ट आणि ड्रेस ठेवलेले असतात. स्टोल्स, चुडीदार, सलवार हे सगळ्यात खालच्या कप्प्यात ठेवलेलं असतं. शिवाय थिएटरमध्ये सिनेमा, नाटक बघायला जाताना मला शाली लागतात. त्या शालीही खालच्या कप्प्यात ठेवलेल्या असतात. रोज वापरते त्या दोन पर्सेस कपाटात समोरच ठेवलेल्या असतात. मी पँट्सवर लाँग कुडतेही घालते. त्यामुळे सलवार कमीजसारखे वापरले जाणारे कुडते मी वेगळे ठेवत नाही. ते सरसकट एकत्रच ठेवलेले असतात. साड्यांसाठी मी ओव्हरहेड स्टोअरेज केलेलं आहे. त्यामुळे त्या खाली कपाटात नसतात.

कुडते लावताना मी रंगांनुसार लावते म्हणजे आपल्याला हवा तो कुडता पटकन सापडतो असा माझा अनुभव आहे. म्हणजे पिवळे, हिरवे, निळे, लाल, गुलाबी असे कुडते मी रंगानुसार वेगवेगळ्या गठ्ठ्यात लावते. रोज वापरायचे कॉटनचे कुडते जरा खालच्या कप्प्यात असतात. तर सिल्कचे कुडते थोडे वरच्या कप्प्यात ठेवते. कपाटात फळी घालून एक मोठा म्हणजे दोन गठ्ठे राहू शकतील असा कप्पा आहे तर एक फक्त एक गठ्ठा राहू शकेल असा लहान कप्पा आहे. त्यात मी पँट्स आणि टीशर्ट ठेवते. कपड्यांचं सॉर्टिंग नीट केलं तर मग फारशी गडबड होत नाही.

मी जे कपडे वापरते त्यानुसार मी कपाट लावते. तुम्ही जे कपडे वापरत असाल त्यानुसार तुमचं कपाट लावा. उदाहरणार्थ – जर सलवार कमीजचा वापर जास्त असेल तर पूर्ण सेट एकत्र करून मग ते रंगांनुसार लावा. किंवा मिक्स अँड मॅच करून वापरत असाल तर कुडते वेगळे, सलवार वेगळ्या आणि ओढण्या वेगळ्या असे गठ्ठे लावा. फक्त साड्याच वापरत असाल तर साडी, तिचा मॅचिंग परकर आणि ब्लाउज असे सेट लावा. किंवा मिक्स अँड मॅच करत असाल तर मग साडी आणि परकर असा गठ्ठा लावा आणि ब्लाउजचा वेगळा गठ्ठा करा. ऑफिसला फॉर्मल कपडे घालत असाल तर मग फॉर्मल शर्ट वेगळे करा. फॉर्मल पँट वेगळ्या करा. आणि नेहमीचे कपडे वेगळे लावा.

IMG20160620130723

माझ्या कपाटातला एक ड्रॉवर जुलरीचा आहे. मी सोनं-हिरे-मोती फारसं वापरत नाही. मी जे सोनेरी पॉलिशचे दागिने वापरते तेही बहुतेकदा चांदीचेच असतात. त्यामुळे माझे बहुतेक दागिने याच ड्रॉवरमध्ये असतात. सोन्याचे अर्थातच लॉकरमध्ये असतात. चांदीचे दागिने हवेत उघडे राहिले तर काळे पडतात. विशेषतः मुंबईसारखी दमट हवा असेल तर लगेचच काळे होतात. पण मला असे काळेच पडलेले दागिने जास्त आवडतात! असो. मी मुख्यतः कानातलीच जास्त वापरते आणि अधूनमधून नाकातल्या मोरण्या. गळ्यात आणि हातात मी फारच कमीदा घालते. त्यामुळे ड्रॉवरमध्ये त्यानुसार सॉर्टिंग करून दागिने लावते. प्रत्येक दागिना लहान लहान झिपलॉकच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत नीट घालून मग तो ठेवलेला असतो. अर्थात मी हे रोज करत नाही. एखादा दिवस अशा उजाडतोच की खूप पसारा झाल्याचं लक्षात येतं आणि मग मला ते आवरावं लागतंच.

पण तरीही, जे लोक खूप कामात असतात. त्यांनी कपाटात वस्तू ठेवतानाच दोन मिनिटं जास्त काढून वस्तू जागेवर नीट ठेवल्या तर त्यांना घाईच्या वेळी त्या पटकन मिळतात. हे सगळं आयडीयली खरंच आहे. पण खूप पसारा करून मग कपाट आवरलं की कसं मस्त वाटतं ना! मग काय मनसोक्त पसारा करा आणि मग छान आवरा!

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s