पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर (भिलवडी, औदुंबर, इस्लामपूर)

सांगली-मिरजची भटकंती करायची ठरवली तेव्हाच इस्लामपूरला जायचं मनात होतंच. याचं कारण फेसबुकवरून ओळख झालेले चित्रकार अन्वर हुसेन हे इस्लामपुरात राहतात. हायवेवरून पेठ नाक्याला सांगली रस्त्याला वळलं की आधी इस्लामपूरच लागतं. तेव्हा परतीच्या प्रवासात इस्लामपूर करायचं हे नक्की ठरलेलं होतंच. इस्लामपूरबरोबर चितळ्यांमुळे प्रसिद्ध पावलेलं भिलवडी आणि त्याजवळच असलेलं औदुंबरही करावं असं ठरवलं होतं.

सांगलीहून परत निघाल्यावर इस्लामपूरच्या आधी भिलवडी लागतं. त्यासाठी मुख्य रस्त्यावरून थोडं आत वळावं लागतं. पण भिलवडीच्या रस्त्यावर वळलो आणि जागोजागी समृद्धीच्या खुणा दिसायला लागल्या. रस्त्याच्या दुतर्फा उसाची हिरवीगारं शेतं, मधूनमधून केशरी झेंडूच्या फुलांनी बहरून गेलेली शेतं, जागोजागी दिसणारी तळी यामुळे हा परिसर डोळ्यांना सुखावणारा होता. भिलवडीला चितळ्यांचा दुग्धव्यवसायाचा मोठा प्रकल्प आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.

भिलवडी गाव ओलांडून पुढे ४ किलोमीटरवर चितळ्यांचा प्लांट आहे. भिलवडीत शिरल्याबरोबर जागोजागी चितळ्यांच्या खुणा दिसायला लागतात. दूध संकलन केंद्रं, चितळे उत्पादनं विक्री केंद्रं असं पावलापावलावर दिसतं. भिलवडी स्टेशनच्या अगदी समोर चितळ्यांचा अवाढव्य प्लांट आहे. या प्लांटच्या आवारातच चितळे कुटुंब राहातं. प्लांट इतका भव्य आहे की तो पाहताना आपण थक्कच होतो.

आम्ही चितळे डेअरीला पोचलो तेव्हा लगेचच आमची डेअरी पाहण्याची सोय करण्यात आली. डेअरीचा एक कर्मचारी आमच्याबरोबर फिरून आम्हाला डेअरीबद्दल माहिती देत होता. पहिल्यांदा आम्हाला त्यानं पहिल्या मजल्यावरच्या viewing gallery त नेलं. अशा कितीतरी फॅक्टरीज आपण चित्रपटांमध्ये, डॉक्युमेंटरीजमध्ये किंवा फोटोंमध्ये बघितलेल्या असतात. पण प्रत्यक्ष बघताना खरोखर भान हरपतं. चितळ्यांच्या प्लांटमध्ये दररोज तब्बल साडेआठ लाख लिटर दूध संकलित केलं जातं. या दुधापासून दही, लोणी, तूप, चीज, पनीर, श्रीखंड आदी उत्पादन केलं जातं. जितकं दूध रोज प्लांटमध्ये येतं तितके नमुने आत येताना आणि बाहेर जातानाही दररोज तपासले जातात. यासाठी चितळ्यांची सुसज्ज लॅब प्लांटमध्ये आहे. सर्व उत्पादन मशीनद्वारेच होतं. पनीर सोडलं तर कुठेही उत्पादनांना मानवी हातांचा स्पर्श होत नाही. अगदी ज्या क्रेट्समध्ये दुधाच्या पिशव्या, श्रीखंडाचे किंवा इतर उत्पादनांचे डबे स्टोअर केले जातात, ते क्रेट्सही मशीनद्वारे सोडा वापरून धुतले जातात. दुधाच्या पिशव्या क्रेट्समध्ये भरण्याचं काम माणसं करतात. नंतर ते क्रेट्स एका बेल्टवरून सरळ बाहेर लावलेल्या गाड्यांमध्ये भरले जातात. दर दुपारी या गाड्या विविध ठिकाणी पुरवठा करण्यासाठी निघतात.

गायीचं आणि म्हशीचं दूध तर उत्तम असतंच. एरवी आमच्या घरात घरचंच तूप असतं. पण दिवाळीत किंवा गणपतीत तळण्यासाठी मी स्वतःही चितळ्यांचंच म्हशीचं तूप वापरते. बरीच वेगवेगळी तूपं वापरल्यानंतर तळण्यासाठी चितळ्यांचंच तूप उत्तम आहे अशा निष्कर्षावर मी पोचले आहे. श्रीखंडाच्या युनिटमध्ये प्लास्टिकच्या रोलमधून बोल तयार होण्यापासून, त्यात श्रीखंड भरून वरून एल्युमिनियम फॉइल लागून, नंतर त्यावर चितळ्यांचं नाव प्रिंट होण्यापर्यंतची प्रक्रिया किती चुटकीसरशी होते हे बघणं मोठं मजेशीर होतं. ते सगळं बघताना एखाद्या लहान मुलासारखं हरखून जायला होतं. प्लांटचे फोटो काढायला मनाई असल्यानं या ब्लॉगमध्ये चितळे प्लांटचे फोटो नाहीत. एक सांगायची गोष्ट म्हणजे त्या दिवशी सगळ्या कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी होती.

प्लांट बघून झाल्यावर आम्ही परत मुख्य कार्यालयात आलो. तिथे आम्ही गिरीश चितळ्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला प्लांटबद्दल तर माहिती दिलीच. पण प्लांट भिलवडीत कसा सुरू झाला हेही सांगितलं. चितळे कुटुंब हे मूळचं सातारा जिल्ह्यातल्या लिंबगोवा या गावचं. अधिक चांगल्या संधीच्या शोधात त्यांचे आजोबा भास्कर गणेश चितळे हे चाळीसच्या दशकात तब्बल ३५० किलोमीटरचा प्रवास करून भिलवडीला आले. त्याआधीही त्यांचा दुधाचाच लहानसा व्यवसाय होता. सर्व्हे शब्दाचा अर्थही जेव्हा फारसा माहीत नव्हता तेव्हा आमच्या आजोबांनी हवा, पाणी, दळणवळणाची साधनं या सगळ्यांचा विचार करून सर्व्हे केला आणि भिलवडीची निवड केली असं गिरीश चितळे सांगतात. भिलवडी परिसरातली हवा उत्तम आहे (आम्ही होतो त्या दिवशी तर दिवसा थंडी वाजत होती), या भागातली जमीन सकस आहे, दुधदुभतं भरपूर आहे, या गावात रेल्वे स्टेशन आहे हे सगळं लक्षात घेऊन त्यांचे आजोबा इथे स्थिरावले. त्यांनी सुरू केलेल्या दुग्धव्यवसायाचा आता केवढा मोठा पसारा वाढला आहे. आमच्या आजोबांनी जो रिसर्च केला त्यावरच आम्ही पुढे आमचा व्यवसाय वाढवलाय असं गिरीश चितळेंनी सांगितलं.

मी जेव्हा त्यांना तुपाबद्दलचं माझं मत सांगितलं तेव्हा ते म्हणाले की खाण्यासाठीचं तूप खमंग म्हणजेच जास्त कढवलेलं लागतं आणि तळण्यासाठीचं तूप जरा कमी कढवलेलं लागतं. या दोन्हींचा सुवर्णमध्य काढून आम्ही तूप तयार करतो. आमचे पदार्थ घरच्या पदार्थांसारखेच लागावेत याकडे आमचा कटाक्ष असतो. आणि ते किती खरं आहे, पाहुणे आले किंवा अचानक श्रीखंड खाण्याची इच्छा झाली की आपण पटकन चितळेंचंच श्रीखंड आणतो की नाही! चितळ्यांचं संपूर्ण कुटुंब प्लांटच्या आवारातच राहातं. एकूण चितळे डेअरीला भेट हा एक मस्त अनुभव होता.

IMG_0473

भिलवडीहून औदुंबरला निघालो तेव्हा वाटेत कृष्णा नदीवरचा पूल लागतो. तिथे जरावेळ थांबलो. नदीला इतकं उधाण होतं की स्तब्ध उभं राहिलं तर आपण नदीकडे ओढलो जातो आहोत असं वाटत होतं.

https://www.youtube.com/watch?v=-7aFyFRcqXc

देव माझा विठू सावळा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा दत्त दिगंबर दैवत माझे ही भक्तिगीतं लिहिणारे हणमंत नरहर जोशी उर्फ कवी सुधांशु हे भिलवडीजवळच्या औदुंबरचे. औदुंबरला कृष्णा नदीच्या काठावर दत्ताचं देऊळ आहे. या देवळाच्या परिसरातच सुधांशुंचं घर आहे. १९३९ पासून सुधांशुंनी औदुंबरला ग्रामीण साहित्य संमेलन घ्यायला सुरूवात केली. हे औदुंबर संमेलन बरंच प्रसिद्ध आहे. हा परिसर फार निसर्गरम्य आहे त्यामुळे तुम्ही जाताजाता तो बघाच असं ब-याच लोकांनी सांगितलं होतं. म्हणून औदुंबरला गेलो. प्रदेश निसर्गरम्य आहे यात शंकाच नाही. घाटावरच दत्ताचं देऊळ आहे. पण यावर्षी प्रचंड पाऊस झाल्यानं देऊळ पाण्याखाली गेलं होतं. बरेचदा पावसाळ्यात ते पाण्याखाली जातंच कारण या भागात बहुतेकदा चांगलाच पाऊस होतो. त्यामुळे वरूनच देऊळ बघितलं. पण कसल्याशा समारंभासाठी देवळाच्या आवारात मांडव घातलेला होता, मोठ्या आवाजात गाणी लावलेली होती. हल्ली बहुसंख्य देवळांच्या परिसरात घाणेरडी, बकाल दुकानं असतात तसं इथंही होतंच. त्यामुळे फार न थांबता आम्ही इस्लामपूरला निघालो.

डिजिटल कट्टाचा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक किंवा यावर्षीचा अनुवाद विशेष पाडवा अंक बघितला असेल तर त्याच्या कव्हरवर असलेली चित्रं लक्षात असतील. ही दोन्ही चित्रं काढली आहेत इस्लामपूरचे चित्रकार अन्वर हुसेन यांनी. अन्वरचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते कविता महाजनकडे. तिच्या बेडरूममध्ये अन्वरनं काढलेलं निळ्या रंगातलं एक सुरेख चित्र लावलेलं आहे. तेव्हा मी अन्वरचं नाव पहिल्यांदा ऐकलं. त्यानंतर मी त्यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मग मी त्यांना अंकाच्या कव्हरबद्दल विचारलं तेव्हा कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी दोन्ही वेळा विनामोबदला आपली चित्रं दिली. अन्वरचं अनहद (अनाहतचा अपभ्रंश, निरंतर) हे घर फार छान आहे असं शर्मिला फडकेकडून ऐकलं होतं. ती आणि शुभा गोखले त्यांच्याकडे जाऊन आल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर अन्वरच्या घरी जायलाच हवं होतं.

जेव्हा हा प्रवास ठरला तेव्हा मी अन्वरला आम्हाला इस्लामपूरमध्ये राहाता येईल असं एखादं हॉटेल सुचवा म्हणून फोन केला. तेव्हा त्यांनी घरीच या असं सुचवलं आणि अर्थातच कुठलेही आढेवेढे न घेता मी ते आमंत्रण स्विकारलंही! अन्वरची बायको नजमा हीसुद्धा फेसबुक मैत्रीणच. पण तिच्याशी कधी प्रत्यक्ष बोलले नव्हते की तिला भेटले नव्हते. त्यामुळे तिला भेटायचीही उत्सुकता होतीच. तशा मी आणि ममता संध्याकाळी ५ वाजता इस्लामपूरला पोचलो. गावात पोचल्यापोचल्याच मुसळधार पावसाच्या सरीनं स्वागत केलं. अन्वर आम्हाला एका विशिष्ट ठिकाणी न्यायला आले होते कारण त्यांचं घर जवळपास गावाच्या बाहेर आहे. घराच्या बाहेरूनच हे घर किती स्वागतशील आहे याची कल्पना येत होती. घराच्या गेटवर जुईचा वेल नुसता भरभरून फुलला होता. फाटकातून आत गेल्याबरोबर सोनचाफा, गुलाब, एक्झोरा अशी फुललेली झाडं होती. अन्वरचे आई-बाबा आणि नजमा आमच्या स्वागतासाठी बाहेरच उभे होते. घरात गेल्यागेल्या नजमानं गरमागरम चहानं स्वागत केलं. नजमा अतिशय हसरी आहे. सतत छान हसत असते. अन्वर अगदी कमी बोलतात, हसतात. नजमा ती कसर भरून काढते.

अन्वरचे वडील हिंदीचे प्राध्यापक होते आणि आई शाळेत शिक्षिका. त्यामुळे अन्वरच्या घरी हिंदी साहित्याची मोठी लायब्ररी आहे. शिवाय कितीतरी मराठी पुस्तकं आहेत. अन्वरचा चौथीतला मुलगा दानिशनं प्रकाश नारायण संतांची सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. आजच्या काळात इतक्या लहान मुलानं इतकं मराठी वाचलेलं असावं याचं मला विशेष वाटलं. चहा घेतल्यावर वरच्या मजल्यावरच्या बैठकीच्या खोलीत किती तरी वेळ गप्पा मारत बसलो.

त्या दिवशी रात्री अन्वर आणि नजमा आम्हाला इस्लामपूरचा प्रसिद्ध अख्खा मसूर खायला घेऊन गेले. इस्लामपूरच्या परिसरात मसूर उत्तम पिकतो आणि त्याची विशिष्ट पद्धतीनं उसळ कम भाजी बनवली जाते. हा मसूर ज्या हॉटेलात मिळतो, तिथे फक्त अख्खा मसूर आणि प्रचंड मोठी तंदुरी रोटी इतकंच मिळतं. याशिवाय या हॉटेलांमध्ये दुसरं काहीही मिळत नाही. पण म्हणूनच या मसुराची चव केवळ अप्रतिम असते. आम्ही घेतलेला मध्यम तिखट चवीचा होता. पण मला काही तो तितकासा तिखट वाटला नाही. याचं कारण हा मसूर शिजवताना त्यात बारीक चिरलेला भरपूर कांदा घालून शिजवला जातो. शिजल्यावर वर आलेला कांदा अलगद बाजूला काढून घेतला जातो. नंतर तेलात हा कांदा, आलं-लसूण आणि टोमॅटो घालून अगदी मऊ होईपर्यंत परतलं जातं. नंतर त्यात तिखट-मीठ घालून हा मसूर एकजीव होईपर्यंत शिजवतात. त्यात दुसरा कसलाही मसाला नसतो असं नजमानं सांगितलं. पण गरमागरम मसूर फारच छान लागतो. अर्थात त्याबरोबर कच्चा कांदा आणि लिंबू हवंच. याबरोबर जी तंदुरी रोटी खायला देतात, ती प्रचंड मोठी असते. मी काही ती संपवू शकले नाही. शेवटी थोडासा जिरा राईस आणि मसूर असंही खाल्लं. घरी परत आल्यावर नजमानं खास आमच्यासाठी बनवलेला शीरखुर्मा खाऊन तृप्त झाले. रात्री परत गप्पांचं एक सत्र झालंच.

 

IMG-20160813-WA0008

माझी बीडच्या शाळेतली मैत्रीण आणि नंतर माझ्या मैत्रिणीची नणंद झालेली मनाली थिटे-कुलकर्णी ही इस्लामपूरलाच राहाते. आम्ही येत असल्याचा फोन तिला केलाच होता. दुस-या दिवशी सकाळी तिनं नाश्त्याला बोलावलं होतं. मऊ लुसलुशीत पोहे, पोळीची बाकरवडी, राइस बॉल्स, ब्रेड का मिठा आणि आल्याचा चहा असा अत्यंत चविष्ट आणि भरपेट नाश्ता तिनं केला होता. मनाली आणि तिचे पती हे दोघेही डेन्टिस्ट आहेत. त्यांच्या दोन्ही मुली मेडिकलला आहेत. मनालीचे दीर जाऊही डॉक्टरच आहेत. त्यांचं घर प्रचंड मोठं आहे. इतकी प्रशस्त घरं बघितली की आम्हा मुंबईकरांना हेवा वाटतो. मनालीचं लग्न झालं तेव्हा मला आठवतंय की ही इस्लामपूरला जाऊन काय करणार अशी चर्चा झाली होती. पण मनाली म्हणते मला इस्लामपूर फार आवडतं. आणि तिथली हवा, टुमदार घरं, हिरवाई पाहिल्यावर त्यात तिच्या म्हणण्यात तथ्य आहे हे जाणवतं.

अन्वरची चित्रं पाहाणं, त्याबद्दल त्याच्याशी बोलणं हा आमचा इस्लामपूरला येण्याचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा झाल्याशिवाय इस्लामपूर सोडणंच शक्य नव्हतं. मनालीकडून घरी आल्यावर अन्वरचा स्टुडिओ असलेल्या खोलीतच गेलो. अकरावीत जाईपर्यंत अन्वरनं कधीही चित्रं काढली नव्हती. अगदी शाळेतही नाही. तोपर्यंत इंजिनियरींग करायचं असंच त्यांच्या डोक्यात होतं. अचानक अकरावीच्या सुटीत ते चित्रं काढायला लागले आणि नंतर काढतच राहिले. हळुहळू त्यांचा कल त्यांच्या वडलांच्याही लक्षात आला. महत्त्वाची बाब म्हणजे अन्वरला त्यांनी विरोध केला नाही तर प्रोत्साहनच दिलं. बारावीनंतर इंजिनियरींग करायचा विचार बारगळला. वडील त्यांना सांगलीच्या कला महाविद्यालयात घेऊन गेले पण त्यावेळी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एलिमेंटरी परीक्षा (जी साधारणपणे शाळेत असतानच दिली जाते) अन्वरनं दिलेली नव्हती. मग परत एक वर्षं थांबून त्यांनी ती परीक्षा दिली आणि पुढच्या वर्षी सांगलीच्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला.

अन्वरला रोजच्या आयुष्यातल्या विषयांवर चित्रं काढायला आवडतात. ते ऑईल, एक्रिलिक आणि वॉटर कलर अशा तिन्ही रंगांचा वापर करतात. शास्त्रीय संगीत हाही अन्वरच्या जिव्हाळ्याचा विषय. लहान असल्यापासून वडील संगीताच्या मैफलींना घेऊन जात असत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या चित्रात संगीत हा विषय येतोच. मिरज हे किराणा घराण्याचं जन्मगाव, ते अन्वरचंही अतिशय लाडकं गाव. मनात आलं की बस पकडून ते मिरजेला जातात आणि चित्रं काढतात. किराणा घराण्याच्या वारशावर त्यांनी चित्रमालिका केलेली आहे. शिवाय मुंबई, विजापूर, मिरज मार्केट, हायवे अशा विषयांवरही त्यांच्या चित्रमालिका आहेत. त्यांनी काही कवी, संगीतकार, साहित्यिक यांची व्यक्तिचित्रंही काढलेली आहेत.  मला चित्रकलेतलं तांत्रिक काहीही कळत नाही. पण अन्वरच्या चित्रांमधला रंगांचा वापर मला आवडतो. याचं कारण मला जे वॉर्म कलर्स आवडतात, म्हणजे किरमिजी, लाल, तपकिरी, पिवळा, काळपट पिवळा, काळपट हिरवा, ग्रे या रंगांचा भरपूर वापर अन्वर करतात. त्यांची चित्रं abstract नसतात हेही मला त्यांची चित्रं आवडण्याचं दुसरं कारण. इमारती, बाजार, माणसं, मानवी व्यवहार हे त्यांच्या चित्रांचे विषय असतात. चित्रकाराला एखादं चित्र, त्यातली रंगसंगती कशी सुचते, याचं मला प्रचंड कुतूहल वाटतं. अन्वरनं एक चित्र दाखवलं. त्या चित्रात एक कडी आणि त्याला अडकवलेलं वर्तमानपत्र होतं. ती कडी धातूची आहे हे चित्रात अगदी स्पष्ट दिसत होतं. तेव्हा मी अन्वरला विचारलं की कुठला रंग दिला म्हणजे तो धातू आहे असं लक्षात येईल हे तुम्हाला कसं कळतं? त्यावर अन्वर म्हणाले – मी जेव्हा एखादं दृश्य पाहातो तेव्हा मला तिथे चित्र दिसायला लागतं. आणि ते चित्र जसंजसं दिसायला लागतं तसतसं तिथे फक्त रंग दिसायला लागतात आणि मग ते कागदावर उतरतं. ही फार सोपी प्रक्रिया आहे आणि ती सवयीनं येते असंही ते म्हणाले!

अन्वरची चित्रं बघितली, त्यावर त्यांना कदाचित बालिश वाटतील अशा शंकाही विचारल्या. फार मजा आली. पाय निघत नव्हता पण मुंबईला परतणं भाग होतं. त्यामुळे परत एकदा नजमानं केलेला अप्रतिम शीरखुर्मा खाऊन निघालो. सांगली-मिरज-भिलवडी-औदुंबर-इस्लामपूर असा एक संपन्न करणारा प्रवास करून परतीच्या मार्गाला लागलो.

सायली राजाध्यक्ष

सर्व छायाचित्रं – ममता पाटील आणि सायली राजाध्यक्ष