अभिजात मिरज

DSC_0222

 

सह्याद्री भटकंतीसाठी सांगलीला जायचं ठरलं तेव्हा अर्थातच मिरज त्यात होतंच. कारण एक तर सांगली आणि मिरज ही जोड शहरं किंवा जुळी शहरं आहेत आणि दुसरं म्हणजे मिरजेला प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा आहे. इथे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच तारवाद्यं किंवा तंतुवाद्यं बनवण्याचे कारखाने आहेत. शिवाय किराणा घराण्याचे अध्वर्यू अब्दुल करीम खान यांची ही कर्मभूमी. म्हणूनच मिरजला जायचं या कल्पनेनं अक्षरशः हुरळून गेले होते.

सांगलीत एक दिवस घालवून दुस-या दिवशी सकाळी मी, ममता आणि सुलभाताई अशा तिघी मिरजला निघालो. सुलभाताईंची मैत्रीण डॉ. माधुरी चौगुले यांनी आमच्या मिरजेतल्या भेटीगाठी ठरवून ठेवलेल्या होत्या. सांगलीतून मिरजेत पोचायला जेमतेम १५ मिनिटं लागली. बाहेरगावी गेल्यावर ज्या हॉटेलमध्ये उतरतो तिथला टिपिकल नाश्ता करण्यात आम्हा दोघींनाही अजिबात रस नसतो. स्थानिक नाश्ता मिळेल अशी ठिकाणं आम्ही शोधतो. त्यामुळे मिरजेत शिरल्यावर तिथल्या श्रेयस या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये शेव घातलेलं उप्पीट, कांदेपोहे आणि वडा सांबार असा नाश्ता करून आम्ही मिरजेच्या फेरफटक्याला सुरूवात केली.

आमचा पहिला टप्पा होता अर्थातच सतार मेकर गल्ली. मिरजेत प्रामुख्यानं सतार, तंबोरा आणि वीणेचे प्रकार तयार होतात. पण त्याचबरोबर हार्मोनियम, तबला, गिटार अशीही वाद्यं तयार होतात. इंडियन म्युझिक हाऊस या नियाज अहमद उर्फ बाळासाहेब मिरजकरांच्या दुकानात आम्ही पोचलो तेव्हा त्यांचे दोन्ही मुलगे मोहसिन आणि मुबीन होते. मिरजकरांची या व्यवसायातली ही सातवी पिढी आहे. मोहसिन हे स्वतः उत्तम सतारवादक आहेतच. त्यांचे स्वतंत्र कार्यक्रमही होतात. शिवाय त्यांना बहुतेक सगळी वाद्यं वाजवता येतात. ते आणि त्यांचे वडील सवाई गंधर्व महोत्सवात आवर्जून तंबोरा साथ करतात. अस्खलित मराठीत मोहसिन यांनी आम्हाला सतार आणि तंबो-याबद्दल माहिती दिली. हे मिरजेचं आणखी एक वैशिष्ट्य. इथले मूळचे मुसलमान इथे इतके मिसळून गेले आहेत की त्यांना आपली वेगळी ओळख दाखवण्याची गरज भासत नाही. आम्हाला सतार कशी बनवली जाते याची इत्यंभूत माहिती हवी होती त्यामुळे मोहसिन आम्हाला सतार तयार होते त्या वर्कशॉपमध्ये घेऊन गेले.

हे वर्कशॉप होतं अब्दुल हमीद यांचं. त्यांचं कुटुंब गेल्या निदान पाच पिढ्या या व्यवसायात आहे. अब्दुल हमीद यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली. सतार किंवा तंबो-याचे जे भोपळे असतात ते खरेखुरे भोपळेच असतात. फक्त ते खाण्यासाठी वापरले जात नाहीत. या भोपळ्यांची खास लागवड केली जाते. मंगळवेढा तालुक्यातल्या चंद्रभागा नदीच्या पात्रात सिद्धपूर, बेगमपूर, मिरी, देगाव अशा गावांमध्ये. साधारणपणे श्रावणात भोपळ्याच्या बिया लावल्या जातात. जे भोपळे सतार बनवणा-यांकडे आलेले असतात त्यातल्याच बिया परत त्या शेतक-यांकडे पाठवल्या जातात. म्हणजे त्याच दर्जाचे मजबूत भोपळे परत मिळतात. श्रावणात लावलेलं भोपळ्याचं पीक साधारणपणे मेमध्ये तयार होतं. त्यावेळी एका भोपळ्याचं वजन जास्तीतजास्त ५० किलोही असू शकतं. नंतर वाळल्यावर ते वजन कमी होतं. तयार झालेले भोपळे वाळायला किमान चार महिने लागतात. भोपळे वाळल्यावर ते सतारीसाठी किंवा तंबो-यासाठी हव्या त्या आकारात कापले जातात. स्त्रियांसाठीचे तंबोरे लहान असतात तर पुरूषांसाठीचे मोठे. त्यानुसार भोपळ्याचा आकार ठरवला जातो. यावर्षी पुरूषांसाठीच्या तंबो-यासाठी लागणारे भोपळे आलेलेच नाहीत. त्यामुळे यावर्षी फक्त स्त्रियांसाठीचे तंबोरे तयार होणार आहेत!

भोपळा कापून त्याला कीड लागू नये म्हणून आतून नवसागर किंवा मोरचूद लावलं जातं. ही प्रक्रिया पार पडल्यावर त्यावरचं डिझाइन करायला सुरूवात होते. पहिला टप्पा लाकडाच्या कोरीवकामानं पार पडतो. हे कोरीव लाकूड भोपळ्यावर बसवताना लोखंडी खिळ्यांचा वापर केला जात नाही तर खास लाकडी खिळे बनवून त्याद्वारे हे डिझाइन भोपळ्यावर बसवलं जातं. तंबोरा किंवा सतारीची जी वरची पट्टी असते ती लाल देवदारापासून तयार केली जाते. हे लाल देवदार स्थानिक वखारींमधून विकत घेतलं जातं. साधारणपणे ४-५ वर्षं हे देवदार वाळवलं जातं. नंतरच ते उपयोगात आणतात. ही पट्टी जोडल्यावर भोपळ्यावर खालच्या बाजूला प्लॅस्टिक शीट लावलं जातं. नंतर या शीटमध्ये कोरून सतारीवरचं किंवा तंबो-यावरचं कोरीवकाम केलं जातं. पूर्वी यासाठी सांबराची शिंगंही वापरली जायची. सतार आणि तंबोरीच्या खुंट्यांसाठी एक प्रकारच्या शिसवी लाकडाचा उपयोग केला जातो. तर तारा या स्टील, पितळ किंवा तांब्यापासून बनवल्या जातात. स्टीलच्या तारांचा आवाज अधिक टीपेचा असतो. असा टीपेचा तंबोरा सोलो वाद्य वादनात वापरला जातो. या सगळ्या कारागीरांना तंबोरा किंवा सतारीच्या तारा किती कसून आवळायच्या त्याचं ज्ञान असतं. त्यांना त्याचा कान असतो. त्यांना ही वाद्यं कामचलाऊ तरी वाजवता येतातच. एक तंबोरा किंवा सतार करायला साधारणपणे १५ दिवसांपासून पुढे कितीही वेळ लागू शकतो. त्यामानानं सतार किंवा तंबो-याला किंमत मिळत नाही. त्यामुळे आता नवीन लोक या व्यवसायात यायला कचरतात. कारण श्रम आणि त्याचा मोबदला याचं गणित व्यस्त आहे.

आता बरेच गायक इलेक्ट्रॉनिक तंबो-याचा वापर करतात तो का? असं मी मोहसिन मिरजकरांना विचारलं. तेव्हा तंबोरा प्रवासात न्यायला अवघड असतो म्हणून त्याची जागा इलेक्ट्रॉनिक तंबो-यानं घेतली आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून अनेक प्रयोगाअंती त्यांनी लहान आकाराचा तंबोरा तयार केला आहे. या तंबो-यात भोपळ्याऐवजी संपूर्णपणे देवदाराचा वापर केलेला आहे. हा तंबोरा नेहमीच्या तंबो-यापेक्षा वजनाला हलका आहे. त्यांनी आम्हाला तो वाजवूनही दाखवला. त्यांनी अजून एक गंमतीची गोष्ट दाखवली. ती म्हणजे तंबोरा सुरात लावण्यासाठी आता एक सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ब्लू टूथसारखं दिसणारं हे उपकरण तंबो-याच्या तारांना लावून तंबोरा लावणं सोपं आहे. मिरजकरांनी इतकी सुरेख माहिती दिली की तिथून पाय निघत नव्हता. पण पुढेही ब-याच लोकांना भेटायचं होतं. शिवाय मोहसिनच आम्हाला अब्दुल करीम खान यांची समाधी बघायला नेणार होते. त्यामुळे तिथून निघालो.

बसप्पा हलवाई हे नाव मिरज आणि आसपासच्या परिसरात प्रत्येकाच्या तोंडी होतं. शिवाय प्रवासाआधी ज्या-ज्या व्यक्तीला मिरजेत काय बघण्यासारखं आहे असं विचारलं त्या-त्या व्यक्तीनं बसप्पांकडे जाच असं सांगितलं होतं. त्यामुळे बसप्पांच्या कारखान्याला भेट देणं क्रमप्राप्त होतं. बसप्पांचीही या व्यवयासातली आता चौथी पिढी आहे. मूळचे कर्नाटकातल्या अथनीजवळच्या एका गावातले बसप्पा कामानिमित्त फिरत फिरत मिरजेला आले. १९२९ मध्ये त्यांच्या पेढ्यांचा व्यवसाय सुरू केला. आता त्यांचे नातू नितीन चौगुले व्यवसाय सांभाळतात. पण पेढ्यांबरोबरच बसप्पा प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या खाजासाठी. कोकणातला खाजा वेगळा. हा खाजा आहे तो चिरोटे किंवा पाकातल्या पु-यांच्या जवळ जाणारा. पण याचं वैशिष्ट्य असं की तो अस्सल साजूक तुपात बनवला जातो. मैद्याच्या पोळीला तूप आणि मैद्याचा साटा लावून नंतर त्याची वळकटी केली जाते. ती एकसारख्या आकारात कापून खाजा कापला जातो. नंतर तो साजूक तुपातच खमंग तळला जातो आणि साखरेच्या पाकात टाकला जातो. असा नजाकतीनं तयार झालेला खाजा तोंडात विरघळला नाही तरच नवल. मला स्वतःला फारसं गोड खायला आवडत नाही पण हा खाजा खाल्ल्यावर केवळ ब्रह्मानंदी टाळी लागली. बसप्पांकडचा पेढा हा खवा खमंग भाजून केला जातो. खवा इतका भाजतात की त्यांचा पेढा महिनाभर बाहेर राहिला तरी खराब होत नाही असं ते म्हणाले. अर्थात हा पेढा इतका खमंग असतो की तो महिनाभर टिकायला पाहिजे की! पेढे करताना आधी खवा भाजला जातो. भाजतानाच त्यात जायफळ-वेलची घातलं जातं. नंतर त्यात साखर मिसळली जाते. हा पातळसर कुंदाही खायला अफलातून लागतो. नंतर त्याचा गोळा झाल्यावर पेढे केले जातात. खवा भाजण्याची, त्यात साखर मिसळण्याची सगळी कृती मशीनद्वारेच होते. बसप्पांकडे इतरही मिठाई तयार होते. त्यांचा चिवडाही मला आवडला, त्याला असलेली लसणाची चव मस्त होती. त्यांची सोनपापडीही तोंडात विरघळणारी होती.

बसप्पांच्या मिठाईच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी खोकी फुडग्रेड आहेत. त्यात प्लॅस्टिकचा अंश नाही. या खोक्यांत पदार्थ अधिक काळ ताजे राहतात आणि टिकतात. बसप्पांच्या खाद्यपदार्थांमध्ये प्रिझर्वेटीव्जचा वापर केला जात नाही. कारखान्यात शिरण्याआधी कामगारांसाठी लावलेल्या सूचना मला फार महत्वाच्या वाटल्या. आणि मुख्य म्हणजे त्याच त-हेनं काम सुरू होतं. कारखाना स्वच्छ होता. पावसाळ्याचे दिवस असूनही पेढे आणि मिठाईच्या कारखान्यात एकही माशी दिसली नाही. नितीन चौगुलेंच्या आईही स्वतः रोज सगळ्या कामावर लक्ष ठेवतात. नितीन आणि त्यांच्या आईनं फार आपुलकीनं आमचं स्वागत केलं. जेवायची वेळ होती तर जेवण्याचाही आग्रह केला. पण पेढे आणि खाजा खाऊन पोट तुडुंब भरलेलं होतं. बसप्पांची आता सांगली आणि मिरजेत ५-६ दुकानं आहेत. सांगली-मिरजला कधी गेलात तर बसप्पांकडे आवर्जून जा असं सांगणा-यांमध्ये आता माझी आणि ममताची भर पडली आहे!

IMG20160809140421

 

किराणा घराण्याचे अध्वर्यू अब्दुल करीम खान यांची मिरज ही कर्मभूमी. मिरज हे जुन्या काळापासून रेल्वेचं मोठं जंक्शन होतं. त्यामुळे गाडी बदलायची असेल तर मिरजेला बदलावी लागत असे. असेच एकदा अब्दुल करीम खान कार्यक्रमाहून परतत असताना त्यांना मिरजेला गाडी बदलायची होती. तत्पूर्वीच्या प्रवासात त्यांना प्लेगची लागण झाली. तेव्हा आता आयुष्याची अखेरच होणार आहे तर उरलेलं आयुष्य मिरजेच्या समसुद्दीन मीरासाहेब यांच्या दर्ग्यात परवरदिगाराच्या प्रार्थनेत घालवावं असं त्यांना वाटलं. या दर्ग्यात असलेल्या चिंचेच्या झाडाखाली बसून ते सलग चार तास गात होते. असं म्हणतात की इथेच त्यांचा प्लेग बरा झाला आणि अब्दुल करीम खान यांनी मिरजेत स्थायिक व्हायचं ठरवलं. खानसाहेब मूळचे उत्तर प्रदेशातल्या कैराना या गावचे म्हणून त्यांच्या घराण्याचं नाव झालं किराणा. सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, भीमसेन जोशी, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी असे एकाहून एक दिग्गज गायक किराणा घराण्याचे म्हणून प्रसिद्ध पावले. त्यापैकी सवाई गंधर्व, कपिलेश्वरी, सुरेशबाबू माने हे इथे मिरजेतच गाणं शिकले. बालगंधर्वांचा जन्मही मिरजजवळच्या गावचा. त्यांनी आपल्या नाट्य कारकीर्दीची सुरूवात मिरजेतच केली.

अब्दुल करीम खान यांची समाधी असलेला मीरासाहेब दर्गा हा तब्बल ७०० वर्षं जुना आहे. आता या दर्ग्याच्या आवारात अब्दुल करीम खान यांची तसंच त्यांच्या द्वितीय पत्नी बानूबाई याची मजार आहे.  सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलं. त्या बडोद्याच्या सरदार घराण्यातल्या होत्या. बहुतेक मुस्लिमांच्या मजारी अतिशय साध्या असतात. खुलताबादला औरंगजेबाची मजारही अशीच अतिशय साधी आहे. खानसाहेब आणि त्यांच्या पत्नीची मजार बराच काळ धूळ खात पडलेली होती. बाळकृष्णबुवा कपिलेश्वरींच्या कुटुंबानं त्यांचा जीर्णोद्धार करून आता त्या व्यवस्थित केल्या आहेत. खानसाहेबांच्या मजारीच्या शेजारी संगमरवरात नोटेशन कोरलेलं आहे. बहुधा किराणा घराण्याच्या आवडत्या दरबारीतलं ते असावं असं मला वाटतं. या परिसरात चिंचेची घनदाट छाया आहे. ते ज्या झाडाखाली बसून गात असत त्या झाडाखाली आता संगमरवरी फरशी लावलेली आहे. अब्दुल करीम खान यांचं घर आता विकलेलं आहे त्यामुळे ते आम्हाला बघायला मिळालं नाही. या दर्ग्यात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी संगीत महोत्सवाचं आयोजन केलं जातं. हा दर्गा दाखवायला आमच्याबरोबर मोहसिन मिरजकर आले होते.

गायत्री ही माझी फेसबुकवर झालेली मैत्रीण. ती कलासंस्कृती हे मासिक चालवते. मी जेव्हा सांगली-मिरजला जाणार आहे अशी पोस्ट लिहिली तेव्हा गायत्रीचा इनबॉक्समध्ये मेसेज आला. मिरजेत पाठक अनाथाश्रम आहे तिथे तुम्ही जरूर जा असं तिनं लिहिलं होतं. मी स्वतः त्या संस्थेतली आहे त्यामुळे तुम्ही माझ्या या माहेरी गेलात तर मला फार आनंद होईल असं तिनं सांगितलं. गायत्रीनं असं सांगितल्यामुळे आश्रमात जायलाच हवं होतं. डॉ. नरहर पाठक यांनी हा आश्रम सुरू केला. पहिल्यांदा कुणीतरी अशीच टाकून दिलेली मुलगी ते घरातच सांभाळायला लागले. तेव्हा त्यांची आई होती. ती सोवळंओवळं पाळणारी होती. पण तिनंही कधीही याला आक्षेप घेतला नाही. हळूहळू लोक अशी टाकून दिलेली मुलं त्यांच्या घरी आणून द्यायला लागले. अशी आठ मुलं घरात झाली. त्यांची आई आणि बायकोच ही मुलं सांभाळत, त्यांचं खाणंपिणं करत. पण नंतर जागा कमी पडायला लागल्यावर पाठकांनी आपल्याच दवाखान्यातल्या दोन खोल्या आश्रमासाठी दिल्या. हळूहळू मुलं वाढायला लागली. जागा कमी पडायला लागली तेव्हा त्यांचे एक मित्र श्री. रानडे यांनी आपला वाडा आश्रमाला देणगी म्हणून दिला. आता त्याच जागी आश्रम आहे. आश्रमात येणारी काही मुलं कच-यात, रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी सापडलेली असतात, तर काही मुलं आश्रमात आणून सोडली जातात. काही आया जन्म देण्याआधी पाठकांच्या दवाखान्यात दाखल करून घेतल्या जातात, त्यांची काळजी घेतली जाते. मुलाला जन्म दिल्यावर त्या मूल सोडून निघून जातात. जी मुलं रस्त्यावर सापडतात त्यांची प्रकृती फारशी धडधाकट नसते त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. डॉ. पाठकांचे चिरंजीव डॉ. मुकुंद पाठक आता हाच वसा पुढे चालवाताहेत. या आश्रमाव्यतिरिक्त ते वृद्धाश्रम आणि अंधांसाठीची शाळा आणि वसतिगृहही चालवतात. त्यांनी सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती दिली. मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे ते मॅटर ऑफ फॅक्ट बोलत होते. कुठेही मी असं करतो, तसं करतो असं बोलण्यात नव्हतं. उलट खूप लोकांची मदत असल्यामुळेच हे काम करणं शक्य झालं आणि होतं आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

आता अनाथाश्रमातून दत्तक देण्याची प्रक्रिया केंद्रीय झाली आहे. पूर्वी जेव्हा तसं नव्हतं तेव्हा मुलांना १८ वर्षांपर्यंत वाढवणं, शिकवणं, त्यांना नोकरीला लावून मार्गी लावणं, त्यांच्यासाठी वधुवर मेळावे आयोजित करून त्यांची लग्नं लावणं हे सगळं आश्रमातर्फे केलं जायचं. आश्रमातून लग्न होऊन गेलेल्या मुली अजूनही माहेरपणाला म्हणून आश्रमात येतात हेही मला विशेष वाटलं. डॉक्टर पाठक आम्हाला आश्रम दाखवायला घेऊन गेले. आता दत्तक घेताना मुलगा-मुलगी असा भेद फार कमी झाला आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं.

मला हे मान्यच आहे की परिस्थितीच अशी असते की आईला (बापाला म्हणताच येत नाही कारण अशी परिस्थिती पुरूषावर उद्भवत नाही) मुलांना असं सोडून जावं लागतं. कधी बलात्कार झालेला असतो किंवा कधी कुमारी माता असतात. पण असं असलं तरी मुलाला सोडून जाणं भयानक वाटतं. आश्रमात तीन लहान बाळं होती. तिघेही गोड होती. पण एका मुलीनं तर जादूच केली. ती लहानशी, जेमतेम ६-७ महिन्यांची मुलगी आमच्याकडे बघून इतकी हसत होती की भरूनच यायला लागलं. या मुलांची काळजी घ्यायला पुरेसे कर्मचारी आहेत. काही मोठी मुलं शाळेत गेली होती तर बाकीची आपल्या शिक्षिकेबरोबर होमवर्क करत होती. आश्रमाला सरकारकडून निधी मिळतो, पण तो पुरा पडत नाही. लोक मात्र बरीच मदत करतात असं पाठकांनी सांगितलं. एक कुटुंब गेली अनेक वर्षे आश्रमाला दररोज ५ लिटर दूध पुरवत होतं. काही लोक सणाच्या जेवणांसाठी निधी देतात. पण हे काम किती निरपेक्ष वृत्तीनं चालत आहे हे बघायचं असेल तर या आश्रमाला आणि डॉक्टर पाठकांना नक्की भेटा. खरं सांगते, असं काही पाहिलं की खजील व्हायला होतं. आपण किती लहान गोष्टींबद्दल किती तक्रार करत असतो असं वाटायला लागतं.

 

IMG20160809160007

आपट्यांचे चिरोटे हे सा-या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आपट्यांचा हा चिरोट्यांचा व्यवसाय फक्त ८-१० वर्षं जुना आहे. त्यांच्या आई उत्तम चिरोटे करायच्या. तेव्हा हळूहळू ओळखीच्यांना, नातोवाईकांना पुरवण्यातून या व्यवसायाचा जन्म झाला. आज आपट्यांचे चिरोटे परदेशात जातात. चिरोट्यांबरोबरच चकल्या, डिंकाचे लाडू, चिवडा असे फराळाचे इतर पदार्थही आपट्यांकडे तयार केले जातात. पांढरेशुभ्र अलवार चिरोटे ही त्यांची खासियत. गुलाबासारख्या दिसणा-या पांढ-याशुभ्र चिरोट्यात अगदी आतपर्यंत साखर पोचलेली असते. परदेशात पाठवताना चिरोटे मोडू नयेत म्हणून अगदी फुडग्रेड पॅकिंग केलं जातं. म्हणजे चिरोट्याभोवती चुरमुरे भरले जातात. त्यामुळे चिरोटे मोडत नाहीत. शिवाय सांगली-मिरजेचे चुरमुरे चांगलेच असतात. परदेशातले लोक आता त्याच चिवडा मसाल्याची पुरचुंडी घालण्याची सूचना करताहेत म्हणजे हातासरशी चिवडाही करता येईल! पंतप्रधान नरेंद्र मोदी, लता मंगेशकर यांनी आपट्यांचा चिरोटा खाल्लेला आहे.

 

न. चिं. केळकर या शाळेत शिकले
न. चिं. केळकर या शाळेत शिकले

 

 

आपटे आम्हाला निरोप द्यायला बाहेर आले आणि त्यांनी समोरची शाळा दाखवली. या शाळेतच न.चिं. केळकर शिकलेले होते. ते शिकत होते तेव्हा या शाळेचं नाव शाळा क्रमांक १ असंच होतं. आता त्या शाळेला त्यांचंच नाव दिलेलं आहे.

 

 

 

IMG_0382मी बीडला आणि नंतर औरंगाबादला काही काळ गाणं शिकत होते. त्यामुळे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या आहेतच. म्हणून गांधर्व महाविद्यालयाला भाग द्यायलाच हवी होती. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं मिरजेत आता फक्त रजिस्टार ऑफिस आहे. विष्णु दिगंबर पलुसकरांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. आता देशभरातल्या विशारदपर्यंतच्या परीक्षा गांधर्व महाविद्यालयातर्फे घेतल्या जातात. त्यांचा अर्काईव्ह विभाग वाशीला असून तिथे जवळपास ६५००० सीडीज ऐकायला मिळू शकतात. मिरजेत बाकी काही नाहीये. आपटे, गांधर्व महाविद्यालय आणि खरे वाचन मंदिर या तिन्ही ठिकाणी श्री. बेडेकर यांनी आम्हाला सोबत केली. सगळं आपुलकीनं दाखवलं. त्यांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत.

 

 

खरे वाचन मंदिर हे मिरजेतलं जुनं वाचनालय. १९३३ मध्ये स्थापन झालेल्या या वाचनालयात आज ३७००० हून अधिक पुस्तकं आहेत. वाचनालयातर्फे घेतली जाणारी वसंत व्याख्यानमाला प्रसिद्ध आहे. या व्याख्यानमालेत महर्षि धोंडो केशव कर्वे, वि.दा. सावरकर, आचार्य अत्रे, आचार्य जावडेकर, अहिताग्नी राजवाडे, वि. स. खांडेकर, विनोबा भावे, गांधीजी, पु. ल. देशपांडे यांसारखे रथीमहारथी सहभागी झालेले आहेत. पुलंनी दिलेल्या देणगीतून वाचनालयाचं मुक्तांगण सभागृह उभं राहिलेलं आहे. जुन्या इमारतीच्या वरच्या मजल्याचं बांधकाम बालगंधर्वांनी केलेल्या प्रयोगाच्या शुल्कातून केलेलं आहे. बालगंधर्वांनी त्यासाठी कुठलाही मेहनताना घेतला नव्हता. आज या जागेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या मुलांसाठीचं अभ्यासकेंद्र चालवलं जातं. ज्या-ज्या लोकांनी वाचनालयाला भेट दिली त्यांचे अभिप्राय जतन करून ठेवलेले आहेत. ते मी चाळत होते तर एक मजेशीर गोष्ट बघितली. विनोबांचा जो अभिप्राय होता त्यात एकही शब्द –हस्व लिहिलेला नव्हता अगदी विनोबा हा शब्दही वीनोबा असा लिहिलेला होता. मला ते वाचून फार मजा वाटली. अर्थात त्यामागे काहीतरी कारण असणारच.

सांगलीच्या रस्त्यावर लागताना वॉन्लेस मिशनरी हॉस्पिटल लागतं. माझ्या सासुबाई विजया राजाध्यक्ष यांचा जन्म या हॉस्पिटलमधला आहे. १९३३ साली एका बेल्जियन मिशनरी डॉक्टरनं माझ्या सासुबाईंच्या आईचं त्या काळात सिझेरीयन केलं होतं. त्यामुळे तिथे थांबून त्यांच्यासाठी हॉस्पिटलचा एक फोटो घेतला. सांगली आणि मिरजेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव दिसला. पण कदाचित म्हणूनच तिथे निरपेक्ष बुद्धीनं काम करणा-या अनेक व्यक्तीही आहेत. हे सांगण्यात कुठलाही राजकीय हेतू किंवा पवित्रा नाही. केवळ एक निरीक्षण आहे.

मिरज हे एक जुनं गाव. आदिलशाहीतलं एक महत्वाचं केंद्र. किराणा घराण्याचं जन्मगाव. बालगंधर्वांची कारकीर्द इथे सुरू झाली. भारतातल्या कितीतरी मोठ्या संगीतकारांनी इथून वाद्यं तयार करून घेतली असतील. मिरज हे जुन्या काळापासून उत्तम वैद्यकीय केंद्र मानलं जातं. आजही ती परंपरा या गावानं कायम सुरू ठेवली आहे. मिरजेला जाऊन फार फार बरं वाटलं. मिरजेतल्या वास्तू पाहणं, लोकांना भेटणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. भारावून टाकणारा.

सायली राजाध्यक्ष

सर्व छायाचित्रं – ममता पाटील आणि सायली राजाध्यक्ष