संस्थानिकांची, उद्योजकांची आणि नाटककारांची सांगली

सह्याद्री भटकंतीतला दुसरा टप्पा ठरवला होता सांगली-मिरज-इस्लामपूर. सांगली आणि मिरज हा सगळ्याच दृष्टीनं संपन्न भाग. चांगलं हवामान, चांगलं पाऊसमान या नैसर्गिक देणगीमुळे सांगली जिल्हा सतत हिरवागार दिसतो. एक्स्प्रेस हायवेवरच्या पेठ फाट्यावरून डावीकडे वळलं की सांगलीचा रस्ता लागतो. सध्या पावसामुळे रस्ता खराब झालेला आहे. पण आजुबाजूला सगळं इतकं हिरवंगार आहे की त्याकडे फारसं लक्ष जात नाही. कृष्णा आणि वारणा या दोन नद्या सध्या दुथडी भरून वाहताहेत. त्यामुळे जागोजागी भरलेली पाण्याची तळी, हिरवीगार उसाची शेती, दुतर्फा मोठमोठ्या पारंब्यांनी चव-या ढाळणारी वडाची मोठी झाडं, अधूनमधून दिसणारी बहरलेली, केशरी रंगानं न्हाऊन निघालेली झेंडूची शेतं या सगळ्यामुळे सांगलीकडे जातानाचा प्रवास रम्य होऊन जातो.

सांगली हे पटवर्धनांचं गाव. पटवर्धन हे इथले संस्थानिक. सांगलीत प्रवेश करताना आधी लागते ती सांगलीवाडी. थोडक्यात गावाबाहेरची सांगली. या सांगलीवाडीत आपण प्रवेश करतो तो ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या आयर्विन पुलावरून. हा पूल १९२७ तो १९२९ या दोन वर्षांच्या कालावधीत बांधला गेला. आणि त्यावेळी हा पूल बांधायला ६ लाख ५० हजार रूपये खर्च आला होता. तत्कालीन व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर जनरल आयर्विनच्या हातानं पूलाचं उद्घाटन झालं. या पुलाचे आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर तसंच सल्लागार हे तिघेही चित्पावन ब्राह्मण आहेत! आयर्विन पुलावरून आता जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी आहे.

आयर्विन पुलावरून पुढे सांगलीवाडी पार करून सांगलीत शिरलो की सरळसोट लांबलचक मिरज रस्ता आहे. हाच शहरातला मुख्य रस्ता. या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा लहान लहान रस्ते आहेत. जागोजागी चौक आहेत आणि प्रत्येक मोठ्या चौकात पुतळा आहे. या पुतळ्यांमध्ये गांधीजी, कर्मवीर भाऊराव पाटील, सांगलीचे संस्थानिक पटवर्धन हे तर आहेतच. पण सांगलीमध्ये फारसा कुठे बघायला न मिळणारा पंडित नेहरूंचा पुतळा आहे. सांगलीत शिरलो मात्र आणि रस्त्याच्या दुतर्फा बकाल इमारती दिसायला लागल्या. खरं तर पटवर्धनांच्या सांगलीचं वेगळंच रूप मनात होतं पण प्रत्यक्षात मात्र सांगली फार बकाल झालेली दिसली.

IMG20160810113159

त्याच मुख्य मिरज रस्त्यावर आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरणार होतो ते द ग्रेट मराठा हॉटेल होतं. हॉटेलवर पोचलो, खोलीत सामान ठेवलं आणि जेवलो. नंतर एक तासभर झोप काढून सांगलीत भटकायला तयार झालो. अन्न हेच पूर्णब्रह्मच्या एक वाचक सुलभा भिडे यांनी माझ्या सांगलीत येणार असल्याच्या पोस्टवर कमेंट करताना आपला मोबाइल नंबर दिलेला होता. सुलभाताईंना मी प्रत्यक्ष भेटले तर नव्हतेच पण त्यांचा फोटोही बघितलेला नव्हता. पण त्यांनी त्याआधी दोन दिवस वेळोवेळी फोन करून मला कायकाय बघायचं आहे याची माहिती घेऊन तशी व्यवस्था केली होती. सुलभाताईंनी आमच्या या ट्रीपचं इतकं सुंदर नियोजन केलं होतं की आम्हाला अशा प्रवासातनं जे अपेक्षित होतं ते सगळं काही आम्हाला मिळालं. त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. त्या आम्हाला चार वाजता भेटणार होत्या. तशा त्या भेटल्या. आणि आम्ही हरिपूरला निघालो.

हरिपूर हे सांगलीचं एकेकाळचं उपनगरच असं म्हणायला हरकत नाही. आता तर ते सांगलीतच आहे. हरिपूरला बुधगावच्या पटवर्धनांनी बांधलेलं बागेतल्या गणपतीचं मंदिर आहे. गणपती हे पटवर्धनांचं कुलदैवत त्यामुळे या परिसरात जागोजागी गणपतीची मंदिरं दिसतात. बागेतलं गणपती मंदिर अगदी साधंसंच होतं. शिवाय श्रावणी सोमवारमुळे गाभा-यापर्यंत जाऊन बघता येत नव्हतं. या मंदिराचं आवारही अगदी लहानंसं आहे. मला सगळ्यात काय आवडलं तर मंदिराच्या चहुबाजूंनी असलेली चिंचेची हिरवीगर्द झाडं. ही सगळी झाडं चिंचांनी नुसती लगडलेली होती. हरिपूरला कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम आहे. या संगमावर महादेवाचं जे देऊळ आहे त्याला संगमेश्वरच म्हणतात. मूळ दगडी मंदिराला आता सोनेरी रंग देऊन विद्रूप करून टाकलेलं आहे. मला देवदर्शनात फारसा रस नसल्यामुळे मी दर्शनाच्या रांगेत उभी न राहता मंदिराच्या आवारात फिरले. आपल्याकडे लोकांना अजिबातच सिविक सेन्स नाहीये. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराच्या बाहेर जत्रा भरलेली होती. लोक खाऊन तिथेच कागद, कचरा टाकत होते. मी उकडलेल्या शेंगा घेतल्या. खाऊन फोलपटं हातात ठेवली. कचराकुंडी कुठे आहे असं काही जणांना विचारलं तर टाका न कुठेही असं उत्तर मिळालं. पाऊस उत्तम झाल्यामुळे संगमाला भरपूर पाणी होतं. ते दृश्य मात्र नेत्रसुखद होतं. जत्रेत खाण्याचे, विशेषतः सांगलीच्या प्रसिद्ध भेळेचे बरेच स्टॉल होते. शिवाय घरगुती उपयोगाच्या वस्तुंचेही स्टॉल होते. डोळ्यांना खटकणारी बाब म्हणजे प्लॅस्टिकच्या गोष्टींचे भरमसाठ स्टॉल. माझं लक्ष वेधून घेतलं ते जवळच असलेल्या एका छोट्याशा टपरीवजा दुकानानं. अगदी लहान दुकानात इतर वस्तूंबरोबर विविध ब्रँडचे सॅनिटरी नॅपकिन विकायला होते. जे बघून मला खरोखर बरं वाटलं.

हरिपूर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे हळदीची पेवं. सांगली हे जगातलं सर्वाधिक हळदीचं उत्पादन करणारं केंद्र आहे. इथे फार मोठ्या प्रमाणावर हळदीचा वापर होतो. हळदीचं भरमसाठ उत्पादन होतं तेव्हा हळकुंडं ठेवण्यासाठी या पेवांचा वापर केला जात असे. भारतात अशा पद्धतीनं दुस-या कुठेही खाद्यपदार्थांचा साठा केला जात नाही. पेव म्हणजे काय? तर जमिनीखाली ५-७ मीटर खोल असा रांजणासारखा खड्डा करून त्यात हळकुंडं हवाबंद करून ठेवायची. अशा पद्धतीनं ठेवलेली हळकुंडं ३-४ वर्षं आरामात उत्तम स्थितीत राहात असत. जशी लागतील तशी ती बाहेर काढून त्यांची विक्री केली जात असे. २००५ साली आलेल्या पुरात ही पेवं वाहून गेली आणि आता ही पद्धत जवळपास बंद झालेली आहे.

सांगली हे आद्य नाटककार विष्णुदास भाव्यांचं गाव. साहजिकच इथे एकाहून एक दिग्गज नाटककार उपजले त्यात नवलच नाही. सवाई माधवरावांचा मृत्यू, संगीत मानापमान, कीचकवध, संगीत स्वयंवर अशी नाटकं लिहिणारे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ अशी नाटकं लिहिणारे गोविंद बल्लाळ देवल, पुढे बालगंधर्व म्हणून प्रसिद्ध झालेले नारायणराव राजहंस, असामान्य नट मामा पेंडसे हे सारे सांगली किंवा सांगलीच्या आसपासच्या गावांमधलेच. त्यामुळे सांगलीमध्ये संगीत नाटकांची परंपरा मोठ्या प्रमाणावर रूजली, बहरली.

बाळ गंगाधर टिळकांचे पटशिष्य असलेल्या खाडिलकरांनी केसरीत बराच काळ काम केलं. टिळकांना राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून मंडालेला पाठवण्यात आलं. त्यानंतर खाडिलकरांनी केसरीच्या संपादकत्वाची धुरा वाहिली. टिळकांना ज्या ८ लेखांसाठी दोषी ठरवण्यात आलं होतं त्यातले ३ लेख त्यांनी तर उरलेले ५ लेख खाडिलकरांनी लिहिलेले होते. खाडिलकरांनी बांधलेलं दत्त मंदिर त्यांच्या कुटुंबियांनी आजही मोठ्या प्रेमानं जतन केलं आहे. या दत्त मंदिराच्या परिसरातच त्यांचे पणतू केदार आणि नितीन खाडिलकर यांचा लोखंडी वस्तू बनवण्याचा कारखाना आहे. पूर्वी या जागेवरच एका लहानशा खोपटात खाडिलकर राहात होते. शेवटची काही वर्षं ते गावातल्या वाड्यात न राहता या साध्याशा खोपटातच राहात होते. अखेरच्या काही वर्षांमध्ये ते प्रवचनं देत असत. या काळात जे-जे राजकीय नेते त्यांना भेटले ते याच जागेवर असं केदार खाडिलकरांनी सांगितलं. खाडिलकरांनी नंतरच्या काळात नवाकाळ या साप्ताहिकाची सुरूवात केली. खाडिलकरांनी केवळ नाटक लिहिलीच नाहीत तर दिग्दर्शितही केली. बालगंधर्वांनाही ते शिकवत असत. या दत्त मंदिराच्या आवारात खाडिलकरांच्या कार्याची माहिती देणारा मोठा फलकही लावण्यात आलेला आहे. मंदिरासमोर शेड घालून सभोवती कट्टा बांधलेला आहे. जिथे बसल्यावर फार मस्त वाटत होतं.

DSC_0149खाडिलकरांच्या दत्त मंदिराच्या बाजूलाच रामविश्वास ही सांगलीतली स्थानिक डेअरी आहे. त्याचे मालक श्रीधर गवळी हे आम्हाला डेअरी बघायला बोलावायला आले होते. डेअरीचं दिवसाचं काम संपलेलं होतं. त्यामुळे सगळं शांत होतं. पण या डेअरीमध्ये पाश्चरायझेशन होतं, खवा तयार होतो, बासुंदी, पनीर, लोणी हेही पदार्थ होतात. साधारण १०० लिटर दुधातून २५ किलो खवा तयार होतो ही माहितीही त्यांनीच सांगितली. या सगळ्या गोष्टी मशीनवर तयार होतात. ती सगळी मशीन्स गवळींनी दाखवली. डेअरी अतिशय स्वच्छ होती.

विष्णुदास भावेंच्या स्मरणार्थ दरवर्षी विष्णुदास भावे पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची रक्कम फारशी नसली तरी नाट्यक्षेत्रात हा पुरस्कार मानाचा समजला जातो. विष्णुदास भावे हे मराठी नाटकाचे जनक मानले जातात. त्यांनी लाकडी बाहुल्या तयार करून त्यांचे कठपुतळीचे खेळ सुरू केले. या काही बाहुल्या अजूनही आहेत. काळानुसार अर्थातच त्या आता भग्नावस्थेत होत्या पण रामदास पाध्येंनी त्या बाहुल्यांना नवीन रंगरूप देऊन त्यांचा आपल्या कार्यक्रमांमध्ये वापर केला आहे. सीता स्वयंवर हे मराठीतलं पहिलं नाटक विष्णुदास भावे यांनी १८४३ मध्ये लिहिलं आणि ते रंगमंचावर सादरही केलं. सांगलीतल्या नाट्यगृहाला विष्णुदास भावे यांचं नाव दिलेलं आहे. हे नाट्यगृह सांगली-मिरज रस्त्यावर आहे. या सभागृहात भाव्यांचा जो पुतळा आहे तो त्यांच्या कुटुंबियांनी कर्नाटकातल्या शिल्पकारांकडून बनवून घेतलेला आहे. सांगलीतले एक नाट्यकर्मी मुकुंद पटवर्धन यांनी आम्हाला सभागृह दाखवलं. भाव्यांची एक बाहुली इथे आहे तीही दाखवली. या सभागृहाचं डिझाइन भाव्यांच्या पणतूचं आहे. मी सभागृहाचा बाहेरून फोटो काढत होते तर एक मुलगी आली आणि मला तिनं तुम्ही सायली राजाध्यक्ष का असं विचारलं. इथे आपल्याला कोण ओळखतंय असा विचार माझ्या मनात आला. तर ती अन्न हेच पूर्णब्रह्मची वाचक निघाली. नुपूर कुलकर्णीनं मी सांगली-मिरज करणार असल्याची पोस्ट वाचली होती म्हणून तिनं मला ओळखलं! मजा वाटली हे ऐकून आणि तिला भेटून.

सुलभाताईंना घरी सोडून आम्ही सांगलीच्या प्रसिद्ध संभा भेळेच्या शोधात निघालो. १०० फुटी रोडला संभा भेळेचं मोठं दुकान आहे असं कळलं होतं. रस्ता शोधत गेलो, रस्त्यावर अजिबात दिवे नव्हते त्यामुळे विचारत विचारत तिथे गेलो तर दुकान बंद होतं. बाजूलाच एक दाबेलीवाला होता. विचार केला की दाबेली खाऊ. तर दाबेली संपलेली आणि सँडविचेसही संपलेली! मग संभाचं दुसरं दुकान शोधत गेलो. तर तेही दुकान बंद. मग कळलं की श्रावणी सोमवारनिमित्त संभा भेळेची दुकानं बंद होती. शेवटी मुंबईचीच भेळ सर्वोत्तम असा निष्कर्ष काढला आणि हॉटेलवर परतून जेवलो. पण दुस-या दिवशी सुलभाताईंनी मस्त झणझणीत मिसळ करून आम्हाला जेवायला बोलावलं होतं. त्यामुळे मन भरून पावलं.

दुसरा संपूर्ण दिवस मिरजेत घालवला. त्याविषयी पुढच्या पोस्टमध्ये. तिस-या दिवशी सांगलीतल्या प्रसिद्ध भडंगाचे जनक मानले जाणा-या गोरे बंधूंच्या दुकानात गेलो. चंद्रशेखर गोरेंची आता ही तिसरी पिढी. आणि मजेची गोष्ट म्हणजे ते माझ्या औरंगाबादच्या मैत्रिणीचे स्वाती पाध्येचे मामा निघाले. गोरेंचे आजोबा बुद्धिबळ खेळत असत. बुद्धिबळ खेळायला त्यांच्याकडे बरेच लोक जमायचे. रोज त्यांना काय खायला द्यायचं असा प्रश्न त्यांच्या आजीसमोर होता. सांगलीतले चुरमुरे (इथे चिरमुरे म्हणतात) प्रसिद्ध आहेत. तर त्या चुरमु-यांना मसाला लावून, त्यात दाणे-डाळं घालून आजीनं एक दिवस या सगळ्यांना दिलं. या बैठकीत राजकवी मुजुमदार असायचे. ते म्हणाले की गडंग (भट्टीवर भाजलेल्या लाह्या, चुरमुरे यातला कचरा) काढून उरलेलं ते भडंग! म्हणून या पदार्थाचं नाव भडंग पडलं. लोकांना हा पदार्थ फार आवडला. पुढे गोरेंच्या वडीलांनी त्याचं प्रमाणीकरण केलं. आज गोरे हंगामा आणि जल्लोष अशा दोन प्रकारचे भडंग तयार करतात. हंगामा भडंगात लसूण नसतो तर जल्लोषमध्ये लसूण असतो. गो-यांकडे इतरही मसाले, फराळाचे पदार्थ, आवळ्याचा मुराब्बा आदी मिळतं.

गोरेंनी आमच्यासाठी भडंगाचं प्रात्यक्षिकही ठेवलेलं होतं. महादेव सातवेकर आणि सुनील हिरवे असे त्यांचे अतिशय जुने सहकारी आम्हाला भडंग कसं करतात ते दाखवणार होते. त्यासाठी दुकानाच्या वरच असलेल्या कोठीत आम्ही गेलो. भडंगाची सगळी तयारी होती. भडंग करताना तेल फार कडकडीत तापवायचं नसतं. तेल जरासं कोमट झालं की त्यात खोब-याचे काप तळून घेऊन ते बाजूला काढायचे. मग त्यात भडंगाचा मसाला आणि साखर, मीठ घालून पेस्ट करायची. ती पेस्ट चुरमु-यांवर ओतायची. त्या कढईत भाजलेले दाणे जरासे गरम करून तेही कापांबरोबर वेगळे ठेवायचे. डाळं तसंच चुरमु-यांवर टाकायचं. मसाला चुरमु-यांना खूप वेळ चांगला चोळला की शेवटी खोब-याचे काप आणि दाणे घालायचे. परत हलक्या हातानं कालवायचं. हे झालं भडंग तयार. लसूण घालायचा असेल तर तो खोब-याच्या कापांनंतर तळून घ्यायचा. या सगळ्या प्रक्रियेला फक्त २० मिनिटं लागतात. दीड किलो चुरमु-याचं सगळं साहित्य घालून साडेचार किलो भडंग तयार होतं. गरमागरम भडंगाचा वास असा काही खमंग येत होता की बस! लगेचच त्यावर ताव मारला आणि तृप्त झालो. दुकानासाठी रोज लागणारं ५० किलो भडंग इथेच तयार केलं जातं. पण जो माल बाहेर जातो त्यासाठी त्यांच्या भावाचं MIDC मध्ये वेगळं युनिट आहे. गोरेकाकांनी सगळी मस्त माहिती तर दिलीच पण आमचं छान स्वागतही केलं.

DSC_0276सांगलीतला शेवटचा टप्पा होता कुंभोजकरांचा. कुंभोजकर हे दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करतात. ही त्यांची चौथी पिढी आहे. त्यांचं तूप इतकं प्रसिद्ध आहे की त्यांना तूपवाले कुंभोजकरच म्हणतात. कुंभोजकरांची सून मैथिली ही ब्लॉगची वाचक आहे. सांगलीला येणार म्हटल्यावर तिनं निमंत्रण दिलं होतं. तिच्या सास-यांनी आम्हाला त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. आधी ते फक्त तूप करत असत. हळूहळू त्यांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवली. त्यांची स्वतःची डेअरी नाहीये. त्यामुळे ते घटक पदार्थ बाहेरून मागवतात. आता त्यांनी मिठाया करायलाही सुरूवात केलेली आहे. त्यांचा कलाकंद फार प्रसिद्ध आहे. आपल्याला जो कलाकंद माहीत असतो तो दूध नासल्यानंतर त्याच्या चोथ्यापासून केलेला कलाकंद. पण हा कलाकंद म्हणजे ताज्या खव्याची बर्फी होती. हवा तितकाच गोड आणि व्हॅनिला इसेन्सचा मंद सुगंध असलेला हा कलाकंद तोंडात विरघळत होता. याशिवाय त्यांचे पेढे, आंबा बर्फी, सुक्यामेव्याची बर्फी हे पदार्थही छान होते. मैथिलीनं आता चॉकलेट्स करायला सुरूवात केली आहे. एलिझ चॉकलेट्स हा तिचा ब्रँड आहे. आम्ही तिनं केलेलं डार्क चॉकलेटही खाल्लं. तेही मस्त होतं.

सांगली आणि मिरज हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. इथल्या राज्यकर्त्यांनी ब्रिटिशांशी कायम मैत्रीचे संबंध ठेवल्यानं सांगलीला कधीही कसला त्रास सहन करावा लागला नाही. त्यामुळे मुळात नैसर्गिक वरदान लाभलेल्या सांगलीत उद्योग व्यवसायांची चांगली भरभराट झाली. शिवाय ब्राह्मण राजा असल्यानं इथे बरेचसे व्यावसायिक ब्राह्मण दिसतात. जे इतरत्र फारसं बघायला मिळत नाही. एक प्रकारचं स्थैर्य असल्यानं अनेकांचे पिढ्यानपिढ्यांचे व्यवसाय आहेत. शिवाय त्यांच्या प्रत्येक पुढच्या पिढीनं ते वाढवले आहेत. सांगलीतल्या लोकांना आपल्या संपन्न वारशाचा रास्त अभिमान आहे.

सांगली आणि मिरजेतनं पाय निघत नव्हता. पण पुढचा प्रवासही खुणावत होता. त्यामुळे सांगलीचा निरोप घेऊन निघालो.

सायली राजाध्यक्ष