पुरेपूर कोल्हापूर

 

मी यापूर्वीही अनेकदा कोल्हापूरला गेले आहे. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातलं अतिशय सुबत्ता असलेलं शहर. मोठ्या शहराबरोबरच लहान गावाचं स्वरूप असलेलं. गावात शिरलात कीच तुम्हाला कोल्हापूरच्या अदबशीर संस्कृतीची जाणीव होते. गावात शिरल्या शिरल्या सरळ रस्त्यानं गेलात की पहिल्यांदा ताराराणीचा पुतळा लागतो, पाठोपाठ त्याच रस्त्यावर शाहू महाराज, शिवाजी महाराज असे पुतळे लागतात. कोल्हापूरमध्ये ताराराणी, शाहू महाराज, राजाराम, संभाजी, शिवाजी ही नावं सगळीकडे दिसतात. आपण एका ऐतिहासिक शहरात आलो आहोत याची पदोपदी जाणीव होत राहाते. या शहराला स्वतःचं एक एक खास कॅरेक्टर आहे. गावात जागोजागी जुन्या पद्धतीच्या दगडी, चिरेबंदी वास्तू आहेत. छोट्या छोट्या बंगल्या आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडं आहेत.

कोल्हापुरातल्या माणसाचं बोलणं अदबशीर. अगदी लहान मुलापासून सगळ्यांना अहोजाहोत बोलणार. राजेशाहीचा त्यांच्यावर अजूनही स्पष्ट प्रभाव दिसतो. रस्त्यावर दिसणा-या होर्डिंगमधले पुरूषही फेटे बांधलेले, भरदार मिशा असलेले. याचा उल्लेख मी मंजिरीताई कपडेकरांकडे केला तर त्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, कोल्हापुरात फार कमी बिनमिशीचे पुरूष आहेत! आता सगळ्या जगात सफाचट दाढी केलेल्या पुरूषांची चलती असताना कोल्हापूरनं मात्र आपलं हे वैशिष्ट्य जपलं आहे. बायकांचे जे होर्डिंग बघितले ते बहुतेक दागिन्यांच्या जाहिरातींचे.

कोल्हापूरचं आजचं जे रूप आहे ते घडवण्यात शाहू महाराजांचा फार मोठा हात आहे. या जाणत्या राजानं स्त्री शिक्षणाला, जाती निर्मूलनाला चालना दिली.

कोल्हापुरात कोल्हापुरी साज आणि इतर दागिने प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरी चपला तर मस्तच असतात. मी कॉलेजमध्ये असताना कोल्हापुरी चपलाच वापरायचे. मुंबईत आल्यावर इथल्या घामानं आणि पावसानं त्या खराब व्हायच्या म्हणून बंद केल्या. इंगळे साडी हाऊसमधून लता मंगेशकरांसाठी खास साड्या जातात. त्या दिवशी एक तयार साडी बघितली ती ९६ हजारांची होती. गुजरीमध्ये चिपडे, कारेकर, कागदे असे वेगवेगळे सराफ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घडवतात. ठुशी, वज्रटीक, साज असे पारंपरिक दागिने कोल्हापुरात फार सुरेख मिळतात. इंगळे साडी हाऊसमध्ये उत्तम इरकली साड्या मिळतात. ते त्या इरकल गावाहून मुद्दाम करून घेतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे पैठणच्या (येवल्याच्या नव्हेत) पैठण्या, महेश्वरी, गडवाल या साड्यांचंही फार सुरेख कलेक्शन होतं. अंबाबाईच्या देवळाजवळ खांडकेंच्या दुकानात पारंपरिक धारवाडी खण उत्तम मिळतात. हल्ली सगळ्याच साड्यांमध्ये ब्लाउज असतातच. पण इरकलच्या साडीवर खणाचं ब्लाउज फार सुरेख दिसतं. वर कोल्हापुरी ठुशी किंवा साज घातला तर सोने पे सुहागा!

कोल्हापुरी खाद्यसंस्कृती विशेष आहे. खास इथे मिळणा-या पदार्थांची यादी इतकी मोठी आहे की हे सगळे पदार्थ एका भेटीत चाखणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे ब्लॉगवर अनेकांनी सांगितलेल्या खास ठिकाणी जाऊन सगळे पदार्थ चाखून पाहता आले नाहीत याचा खेद आहे. पण कोल्हापुरला अजून एकदा जावं लागणार आहे हे निश्चित. कोल्हापुरी मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा, सुकं मटण, मटण पुलावा, मटणाचं लोणचं, बाकरवडी, वेगवेगळ्या प्रकारची आइस्क्रीम्स, दावणगिरी दोसा, संगीत चिवडा, मोहक लस्सी, मिलनची भजी, नितीन कँटिनची खांडोळी अशी अमर्याद यादी आहे. मी शाकाहारी असल्यामुळे मी यातल्या ब-याच पदार्थांचा आस्वाद घेऊ शकणार नव्हतेच. पण निदान मला सगळ्या ठिकाणी जायला आवडलं असतं. पण मी सगळीकडे जाऊ शकलेच नाही.

कोल्हापूर भेटीतला अत्युच्च आनंदाचे क्षण कोणते असा विचार केला तर शिवाजी विद्यापीठात भल्या सकाळी मारलेला फेरफटका. विद्यापीठात खूप मोर दिसतात असं ममताला कुणीतरी सांगितलं होतं. त्यामुळे मोर बघायला जायचंच असं ठरवलं होतंच. तशा आम्ही सकाळी साडेसहा वाजता विद्यापीठात पोचलो. महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यापीठांचा परिसर फार सुंदर आहे. सगळीकडे खूप झाडी आहे. पण शिवाजी विद्यापीठानं यात बाजी मारलेली आहे असं मी म्हणेन. पावसामुळे सगळा परिसर नुसता हिरवागार झाला आहे. त्या हिरव्यागार परिसराला मोरांच्या केकांनी नुसतं दणाणून सोडलं होतं. किमान ३५- ४० मोर लांडोरी दिसल्या. फक्त पिसारा फुलवलेला मोर काही बघायला मिळाला नाही. पण झाडावर बसलेले, इकडून तिकडे मुक्तपणे फिरत असलेले किती तरी मोर बघितले. अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटलं. हिरव्यागार पार्श्वभूमीवर निळे-जांभळे मोर बघणं हा केवळ अद्वितीय अनुभव होता. उत्तम, खड्डे नसलेले रस्ते, घनदाट झाडी, जागोजागी पाण्याची तळी, केवळ अद्भुत! फार सुंदर सकाळ अनुभवायला मिळाली.

अंबाबाईच्या काय कुठल्याच देवळात जाणं मला स्वतःलाच फारसं आवडत नाही. पण सासुबाईंनी अभिषेक करायला सांगितला होता शिवाय ममतालाही जायचं होतं म्हणून पहाटे ५ ला उठून, तयार होऊन देवळात गेलो. देवळाच्या आवारात चपला घालून येऊ देत नाहीत. त्यामुळे बाहेर चपला काढून पावसानं पचपच झालेल्या आवारात पायी चालणं अंगावर काटा आणणारं होतं. अनवाणी चालायला अजिबात हरकत नाही. पण मग आवार स्वच्छ नको का? आरतीला प्रचंड गर्दी होती. आरती झाल्यावर लोक दर्शन घेत होते त्यांना सेकंदभरही देवीसमोर उभं राहाता येत नव्हतं, असे पुजारी त्यांना ढकलत होते. नंतर आम्हाला देवीपासून बरंच लांब बसवलं आणि भटजींनी ममताला सांगितलं की अभिषेक फक्त पुरूषांना करता येतो. बायकांना फक्त संकल्प करता येतो. म्हणजे बघा अंबाबाई ही स्त्री आणि तिला अभिषेक करण्याचा अधिकार फक्त पुरूषांना! कोल्हापुरातच भेटलेली अरूंधती पवार म्हणाली की, मला लहानपणापासून एक प्रश्न पडला आहे. देवी ही स्त्री आहे. तिला आंघोळ घालण्यापासून, तयार करून तिला साडी नेसवण्यापर्यंत सगळं पुरूष पुजारी करतात. असं का? प्रश्न खरोखर विचार करायला लावणारा आहे. सगळे भटजी तुंदिलतनू तर होतेच पण फक्त कद नेसून वावरत होते.

कोल्हापूरबद्दल कळलेली आणि मला फार विशेष वाटलेली अजून एक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी कोल्हापुरात जागोजागी जिलब्यांचे स्टॉल लागतात. कितीही गरीब माणूस असला तरी तो घरी जिलब्या नेतोच. सगळेजण एकमेकांना जिलब्या खायला घालतात. शिवाय व्यावसायिक आपल्याकडे काम करणा-या कामगारांना आवर्जून जिलब्या देतात. मला ही प्रथा फारच विशेष वाटली. आपला स्वातंत्र्य दिन सगळे मिळून इतक्या उत्कटतेनं साजरा करतात ही कल्पनाच किती विलक्षण आहे! आणि ही परंपरा फार जुनी आहे असंही समजलं.

कोल्हापुरात उत्तम दावणगिरी दोसा मिळतो. आम्ही रंकाळ्याजवळच्या स्टॉलवर खाल्लेला दोसा अफलातून होता. बरोबरची चटणी आणि भाजीही फर्मास होती. दुस-या दिवशी सकाळी अंबाबाईच्या देवळातून निघालो आणि विद्यापीठाच्या रस्त्याला लागलो. सकाळी लवकर निघाल्यामुळे चहाही घेतला नव्हता. त्यामुळे चहा तर प्यायचाच होता. रस्त्यावरच एक नागेश टी स्टॉल म्हणून चहाची गाडी दिसली. अत्यंत हस-या चेह-याच्या, प्रसन्न शोभाबाई आणि त्यांचं कुटुंब ही गाडी चालवतं. त्यांनी उत्तम असा स्पेशल चहा करून दिला शिवाय बरोबर गरमागरम कांदेपोहे वरून शेव घालून दिले. उत्तम नाश्ता झाला. दुपारचं जेवण मिरची या मराठी जेवण देणा-या रेस्टॉरंटमध्ये केलं. आश्लेषा मुंगेरवडी यांचं हे रेस्टॉरंट अतिशय लहान आहे. पण इथे मिळणारं जेवण फार चवदार आहे. मेथी पिठलं, गवार फ्राय, ठेचा, लसणाचं तिखट आणि भाकरी असं आम्ही जेवलो. मिरचीच्या जेवणाला इतकी मागणी आहे की आता त्यांची शाखा पुण्यातही उघडली आहे. रात्रीचं जेवण तर खासच होतं. मनीषा राजाज्ञ या फेसबुकवरून भेटलेल्या मैत्रिणीनं तिच्या घरी काही सुगरणींना बोलावलं होतं. ज्यांच्याकडून मी त्यांच्या अस्सल कोल्हापुरी रेसिपीज घेतल्या. शिवाय या सुगरणींनी केलेले पदार्थही चाखले. मनीषाताईनं मिसळ, बुंदीच्या लाडवांची पोळी, आलेपाक असे अनेक पदार्थ केले होते. तिच्या विहिणबाई या दक्षिण भारतातल्या धर्मस्थळ या गावच्या आहेत. त्यांनी इडली रव्याचे इन्स्टंट उंडे करून दाखवले आणि खिलवलेही. त्याबरोबर त्यांचं ताज्या मसाल्याचं खास सांबारही होतं. मनीषाताईच्या मावस बहिणीनं तिखट केक करून आणला होता. तोही फार सुरेख होता. दुस-या दिवशी सकाळी मंजिरी कपडेकरांनी बोलावलं होतं. मंजिरीताई कुकरी क्लासेस घेतात. त्या सुगरण तर आहेतच. त्यांनी मिसळ, भजी, खीर, कडबोळी असा बेत केला होता. मला त्या दिवशी बरं नव्हतं त्यामुळे मी फारसं खाल्लं नाही. पण ममतानं सगळं खाल्लं आणि ते मस्त होतं असंही सांगितलं. कोल्हापुरातलं शेवटचं जेवण झालं ते अनंत खासबारदार यांच्या घरी. गरमागरम सांज्याच्या पोळ्या आणि मसालेभात खाऊन तृप्त झालो.

कोल्हापुरातल्या माणसांना फार अगत्य आहे हे माहीत होतंच, अनुभवही होता. पण या भेटीत ते पुन्हापुन्हा जाणवत राहीलं. मनीषा राजाज्ञ ही फेसबुकवर भेटलेली मैत्रीण. ती माझे ब्लॉग नियमितपणे वाचते. त्यामुळे जेव्हा मी कोल्हापूरला येते आहे अशी पोस्ट लिहिली तेव्हा तिनं लगेचच मेसेज करून मी सगळी मदत करेन असं सांगितलं. तिच्या पायाचं प्लॅस्टर नुकतंच काढलेलं होतं, शिवाय ती व्हायरल तापानं बेजार होती. असं असूनही भर पावसात ती आम्हाला घ्यायला हॉटेलवर आली. तिनं काय काय करता येईल याची सविस्तर यादी केली होती. तिनं आम्हाला इंगळे साडी हाऊस, कारेकर सराफ, कागदे सराफ असं सगळं फिरवलं. नंतर दावणगिरी दोसा खिलवला. कोल्हापूरला जाऊन सोनाली नवांगुळला भेटले नाही असं होणारच नव्हतं. मनीषाताई आम्हाला तिच्याकडेही घेऊन गेली. सोनालीला काही करावं लागू नये म्हणून बरोबर उकडीचे मोदक घेऊन आली होती. सोनालीशी बोलणं हा एक अनुभव आहे. तिच्या उत्साहाचा संसर्ग आपल्याला होतोच, इतकी ती आनंदात असते. आपल्या त्रासाबद्दल, विकलांगतेबद्दल कसलीही तक्रार नाही, उलट मजेत त्याची चेष्टाच करणं तिच्याकडून शिकण्यासारखं. तिनं तिला वावरता येईल अशा सगळ्या सोयी घरात करून घेतल्या आहेत. ती स्वयंपाक करते, लिहिते, बाहेर जाते. अतिशय स्वच्छ, टापटिपीचं घर आहे. सोनालीकडे बघितल्यावर असं वाटतं की आपण किती लहान लहान गोष्टींचा बाऊ करतो…

IMG_20160717_224909

दुस-या दिवशी दुपारी कविता गगराणी या मैत्रिणीनं मोहक लस्सी या कोल्हापुरातल्या प्रसिद्ध लस्सीच्या दुकानाच्या प्रणेत्या सीमा शहा यांच्याकडे नेलं. सीमा शहा यांनी अत्यंत गरीबीतून हा व्यवसाय आज कुठल्या कुठे नेला आहे. साबुदाण्याची खिचडी आणि लस्सी हे त्यांचे खास पदार्थ. आषाढी एकादशीच्या दिवशी ७०० किलो साबुदाणा खिचडी विकली गेल्याचं त्यांनी सांगितलं. आता त्यांनी दुधाचे सगळे पदार्थ तयार करण्याचाही व्यवसाय सुरू केलेला आहे. शिवाय रेस्टॉरंटमधल्या पदार्थांच्या यादीतही बरीच वाढ केली आहे. कविताताईंनी कोल्हापुरातल्या चित्रपट उद्योगावर पीएचडी केलेलं आहे. त्या विषयी तिच्याशी बोलणं राहिलेलं आहे. संध्याकाळी मनीषाताईकडे अनेक सुगरणी भेटल्या. त्यातल्या तिघीजणी कॉलेजमध्ये शिकवणा-या होत्या. आपली कामं आटोपून गप्पा मारायला आणि रेसिपी सांगायला त्या खास आल्या होत्या. अरूंधती पवारनं मला खास कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मटण पुलावा, मटणाचं लोणचं, सुकं मटण, शाही पुडिंग अशा रेसिपीज सांगितल्या. शिवाय तिनं काही रेसिपीज लिहूनही आणल्या होत्या. त्या मी करून बघणारच आहे आणि शेअरही करणार आहे. दुस-या दिवशी सकाळी मंजिरी कपडेकरांकडे गेलो. त्यांचे पती हर्षराज कपडेकर यांना मी लोकसत्ता पूर्णब्रह्मच्या कार्यक्रमात भेटले होतेच. पण यावेळी त्यांच्याशी वेगळ्या गप्पा झाल्या. हे सगळं कुटुंब एकमेकांच्या कामात अगदी रंगून गेलेलं आहे. मंजिरीताईंचे पती त्यांच्या क्लाससाठी रोज लागणारी सामुग्री आणून देण्यापासून त्यांच्या शुटिंगच्या वेळी त्यांच्याबरोबर जाण्यापर्यंत सगळं आनंदानं करत असतात.

कोल्हापूरमधली शेवटची भेट होती ती अनंत खासबारदार यांची. त्यांच्याशी तुझ्या खूप गप्पा होतील असं ममतानं मला आधीच सांगितलं होतं. आम्ही त्यांच्या घरी पोचलो मात्र मी अंगणातच खिळून राहिले. अंगणात त्यांनी एक कुंड बांधलेलं आहे. ६४ कलांचं प्रतिनिधित्व करणारं हे कुंड फार देखणं आहे. त्याच्या बाजूलाच असलेल्या बांबूच्या बनामुळे त्याचं रूप अजूनच बहरून आलेलं आहे. माझा तर पाय तिथूनच निघत नव्हता. हा बंगला त्यांच्या वडलांनी बांधलेला आहे. वरच्या मजल्यावर त्यांचं निर्मिती या जाहिरात आणि प्रसिद्धी संस्थेचं कार्यालय आहे. हा मजला अनंत खासबारदार यांनी बांधलेला आहे. ऑफिस तर सुरेख आहेच पण त्यांनी त्यांची जी स्टडी केलेली आहे ती केवळ अप्रतिम आहे. ते जिथे कामाला बसतात त्या बैठकीच्या मागे मोठी पारदर्शक काच लावलेली आहे. ज्यातून चाफ्याचं मोठं झाड दिसतं. त्या खोलीत गेलं कीच मन शांत होत जातं. संपूर्ण खोलीला डल असा सोनेरी रंग दिलेला आहे. काही भिंती सोनेरी रंगातच पण वेगवेगळे पोत केलेल्या आहेत. बसायला ठेंगण्या बैठका आहेत. आणि खासबारदार यांच्या कामाचं जुन्या पद्धतीचं मुनीमजी डेस्क आहे. स्वच्छ भारत अभियानाचा गांधीजींच्या चष्म्याचा जो लोगो आहे तो खासबारदार यांनी केलेला आहे. त्यांनी मालिकांचं लिखाण केलेलं आहे, अनेक जाहिरातींचं लिखाण केलेलं आहे. ते आपल्या कामाबद्दल अगदी रंगून जाऊन बोलतात. त्यांना त्यांच्या कामाबद्दल आस्था आहेच. पण त्याचबरोबर ते अर्थार्जनाचं साधन आहे याचं भानही आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना खूप वाचायचं, लिहायचं, इतरही बरंच काही करायचं आहे. ते आता काही मुलींसाठी यशार्थ हे हॉस्टेल सुरू करताहेत. त्यांच्या पत्नीही यात सहभागी आहेत.

कोल्हापूरच्या या एका भेटीनं मन काही भरलेलं नाहीये. कोल्हापुरातले दूध कट्टे बघायला गंगावेशीला जाता नाही आलं, रंकाळा बघायचा राहिला, अवनी, स्वयंसिद्धा या संस्थांना भेट द्यायची राहिली. कोल्हापुरात परत जाणं क्रमप्राप्त आहे.

सायली राजाध्यक्ष

सर्व छायाचित्रं – सायली राजाध्यक्ष, ममता पाटील